मुंबई : भारतीय क्रिकेटमधील भविष्याचा तारा म्हणून मोहम्मद सिराजकडे पाहिले जात आहे. प्रतिकूल परिस्थितीतून वर आलेल्या या खेळाडूने प्रचंड मेहनतीच्या जोरावर भारतीय संघाचे दार ठोठावले आहे. मध्यम वर्गीय कुटूंबात जन्मलेल्या सिराजचे वडील रिक्षा चालवतात, आई छोटीछोटी काम करून त्यांना मदत करते. सिराजचा भाऊ अभियांत्रिकी शिक्षण घेत आहे.
सिराजने लहानपणीच भारतीय क्रिकेट संघाकडून खेळण्याचे स्वप्न पाहिले होते. अर्थात त्याच्या या स्वप्नात आर्थिक समस्येचा अडथळा होताच. पण, त्याहीपेक्षा क्रिकेट खेळण्यासाठी आईचा असलेला विरोध, हा त्याचा मार्गातील मोठा अडथळा बनला होता. मात्र, त्याने जिद्दीने भारतीय क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्याने 2017 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले. त्याला भारत 'A' संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आणि तेथेही त्याने आपली छाप पाडली.
या यशानंतर आई शबाना यांनी सिराजच्या क्रिकेट खेळण्याच्या विरोध करण्याच्या भूमिकेबद्दल माफी मागितली. त्या म्हणाल्या,'' क्रिकेट सोडण्यासाठी मी त्याला ओरडायचे आणि घाबरवायचेही... त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, हा त्यामागचा हेतू होता. शिकून त्याला चांगली नोकरी मिळाली असली. घरात नेहमी आर्थिक समस्या असायची आणि त्यामुळे सिराजने क्रिकेटमध्ये वेळ वाया घालवू नये, असे मला वाटायचे. आमच्या कुटुंबातही कुणी क्रिकेट खेळणारे नव्हते. त्यामुळे त्याच्या भविष्याची चिंता लागलेली असायची. परंतु, त्याने घेतलेल्या या भरारीवर माझा विश्वास बसत नाही.''