ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क ( Mitchell Starc) अनेकदा फ्रँचायझी क्रिकेटमधून दूर असतो. त्याने इंडियन प्रीमिअर लीगमध्येही न खेळण्याचा निर्णय घेतला. अन्य खेळाडूंप्रमाणे स्टार्कही फ्रँचायझी क्रिकेटमध्ये जास्त पैसे कमवू शकतो, पण तरीही त्याने देशासाठी खेळण्यास नेहमी प्राधान्य दिले आहे. स्टार्कसाठी कसोटी क्रिकेट महत्त्वाचे आहे आणि तरुणांनाही त्याच मार्गावर चालावे, अशी त्याची इच्छा आहे. स्टार्कने एका मुलाखतीत सांगितले होते की, मला आयपीएल आवडले. मी यॉर्कशायरसोबत १० वर्षे घालवली. पण ऑस्ट्रेलिया माझ्यासाठी नेहमीच प्राधान्य आहे.
स्टार्क म्हणाला की, लीगमध्ये न खेळल्याने मी दु:खी नाही. पैसा येईल आणि जाईल, पण मी खूप भाग्यवान आहे की मला राष्ट्रीय संघाकडून खेळण्याची संधी मिळत राहिली. कसोटी क्रिकेटला जवळपास १०० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे आणि ऑस्ट्रेलियाकडून फक्त ५०० खेळाडू खेळले आहेत. त्यामुळे हे माझ्यासाठी खास आहे. मला कसोटी क्रिकेटचं भविष्य उज्वल वाटते, कारण असे अनेक तरुण आहेत ज्यांना कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करायचे आहे. पण इझी मनी फक्त फ्रँचायझी क्रिकेटमध्येच मिळते.३३ वर्षीय गोलंदाज २०१५ मध्ये शेवटचा फ्रँचायझी क्रिकेट खेळला होता. तो आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला. स्टार्क म्हणाला की, मला पुन्हा आयपीएल खेळायचे आहे. पण सध्या ऑस्ट्रेलियाकडून खेळणे हे माझे ध्येय आहे.
स्टार्कने अॅशेस आणि इंग्लंडबद्दलही चर्चा केली. तो म्हणाला की, इंग्लंडने कसोटी क्रिकेट बदलले आहे. कारण ब्रेंडन मॅक्युलममध्ये संघ बेसबॉल शैलीत खेळत आहे,जे पाहणे मजेदार आहे. पण आता ऑस्ट्रेलियन गोलंदाजीसमोर इंग्लंडचा संघ अशाप्रकारचे क्रिकेट खेळू शकेल का, हे पाहावे लागेल.