लंडन : भारतीयांवर मस्करी म्हणून कथित वर्णद्वेषी प्रतिक्रिया केल्याने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) आपल्या राष्ट्रीय संघाचा मर्यादित षटकांचा कर्णधार इयॉन मॉर्गन आणि यष्टिरक्षक-फलंदाज जोस बटलर यांची चौकशी करत आहे. प्रत्येक प्रकरणाचा वैयक्तिकरीत्या विचार होईल, असे ईसीबीने स्पष्ट केले आहे.बटलर आणि मॉर्गन यांनी केलेल्या पोस्टमध्ये भारतीयांची मस्करी करण्याच्या हेतूने ‘सर’ शब्दाचा वापर केला आहे. काही दिवसांपूर्वीच वादग्रस्त ट्विट केल्यामुळे ओली रॉबिनसन या वेगवान गोलंदाजास इंग्लंडने निलंबित केले. यानंतर आता मॉर्गन आणि बटलर यांच्या ट्विटची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.टेलिग्राफ सीओ यूके या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, ‘बटलरच्या मेसेजचा स्क्रीनशॉट प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये त्याने म्हटले आहे की, ‘मी सर नंबर एकला नेहमी हेच उत्तर देतो. माझ्यासारखा, तुमच्यासारखा.’ मॉर्गनने बटलरला टॅग करत मेसेज केला की, ‘सर, तुम्ही माझे आवडते फलंदाज आहात.’ आयपीएलमध्ये बटलर राजस्थान रॉयल्सकडून, तर मॉर्गन कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार आहे.
स्टुअर्ट ब्रॉडला ॲन्डरसनने म्हटले होते, ‘लेस्बियन’! वेगवान गोलंदाज ओली रॉबिनसनच्या वादग्रस्त ट्विटमुळे इंग्लंड क्रिकेटमध्ये भूकंप आला. आता एकापाठाेपाठ एक अशी वादग्रस्त प्रकरणे पुढे येत आहेत. रॉबिनसनला निलंबित केल्यानंतर जेम्स अँडरसनसुद्धा या वादात अडकण्याची शक्यता आहे. त्याचे ११ वर्षांपूर्वीचे एक ट्विट समोर आले. त्यात त्याने सहकारी स्टुअर्ट ब्रॉडला ‘लेस्बियन’ म्हटले होते. ३८ वर्षांच्या अँडरसनचे हे ट्विट फेब्रुवारी २०१० चे आहे. तो लिहितो, ‘आज मी पहिल्यांदा ब्रॉडचे नवीन हेअरकट पाहिले. तो १५ वर्षाच्या लेस्बियनसारखा दिसत आहे.’ हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर अँडरसनने स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला, ‘माझ्यासाठी ही १०-११ वर्षांपूर्वीची घटना आहे.’
रॉबिन्सनला संधी द्या : होल्डिंग इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन याने लहानपणी वर्णद्वेषी ट्विट केल्या प्रकरणी ईसीबीने त्याला निलंबित केले. हे निलंबन योग्य ठरविताना वेस्ट इंडिजचे दिग्गज मायकेल होल्डिंग यांनी त्याला पुन्हा संधी देण्याची शिफारस केली.