Ellyse Perry: क्रिकेट हा पुरूषांचा खेळ ही संकल्पना आता जुनी झाली. हल्ली महिलादेखील पुरूषांच्या तोडीचे क्रिकेट खेळून दाखवतात. महिलांच्या क्रिकेट सामन्यांमध्ये रोमांच आणि स्पर्धा तर असतेच, पण त्यासोबत ग्लॅमरचा तडकाही असतो. सध्याच्या घडीला महिला क्रिकेटमध्ये अनेक सौंदर्यवती आहेत. त्यापैकीच एक क्रिकेटर म्हणजे ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी. एलिस पेरी ही फलंदाज आणि वेगवान गोलंदाज आहेच. त्यासोबतच ती एक उत्तम फिल्डर देखील आहे. नुकतेच तिने स्वत:ला कर्णधार म्हणूनही सिद्ध केले आहे. पण जगातील सर्वात सुंदर क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या एलिस पेरीला मैदानातील एका चुकीमुळे मोठा दणका बसला.
एलिस पेरीवर बंदीची कारवाई
ऑस्ट्रेलियाची स्टार खेळाडू एलिस पेरीवर बंदी घालण्यात आली आहे. या बंदीमुळे ती महिला बिग बॅश लीगच्या पुढील मोसमातील सलामीचा सामना खेळू शकणार नाही. खरं तर, एलिसला WBBL सामन्यादरम्यान ३ वेळा एकच चूक केल्यामुळे शिक्षा झाली. एलिस पेरी ही महिला बिग बॅश लीगमधील सिडनी सिक्सर्सची कर्णधार आहे. नुकत्याच संपलेल्या टूर्नामेंटच्या चालू हंगामात कर्णधार म्हणून, तिला स्लो ओव्हर रेटसाठी तीनदा दंड ठोठावण्यात आला. तिसऱ्यांदा तिने WBBL च्या फायनलमध्ये एडिलेड स्ट्रायकर्सविरुद्ध ही चूक केली. त्यानंतर तिच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली.
----
बंदीच्या कारवाईचा अर्थ एलिस पेरी WBBL 9 मध्ये तिच्या संघाकडून पहिला सामना खेळू शकणार नाही. एडिलेड स्ट्रायकर्स विरुद्ध WBBL 8 च्या अंतिम सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी तिसऱ्यांदा तिला दंड ठोठावण्यात आला. तिने निर्धारित वेळेत एक षटक कमी टाकले होते. सिडनी सिक्सर्स आणि एलिस पेरी यांनी स्वतःची ही चूक मान्य केली आहे. मात्र, एलिस पेरीवरील बंदीमुळे तिच्या भारत दौऱ्याच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम होणार नाही. ही बंदी फक्त WBBL पुरती मर्यादित आहे. ऑस्ट्रेलियाचा महिला क्रिकेट संघ सध्या टी२० मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियन संघासोबत एलिस पेरीही मुंबईत आहे.