अबूधाबी : यंदाच्या टी-२० विश्वचषकातील अत्यंत महत्त्वाचा सामना आज न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळवला जाणार आहे. कारण या एका सामन्याच्या निकालावर तीन संघांचे भवितव्य दावणीला लागले आहे. तसेच हा सामना अफगाणिस्ताननेच जिंकावा, यासाठी अफगाण नागरिकांबरोबरच भारतीय क्रिकेटप्रेमीही प्रार्थना करताना दिसतील. कारण न्यूझीलंडने जर या सामन्यात विजय मिळविला तर अफगाणिस्तानबरोबरच भारतीय संघासाठीही उपांत्य फेरीची दारे बंद होतील. त्यामुळे भारताच्या दृष्टीने या सामन्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
सलग तीन विजयामुळे सध्या न्यूझीलंडचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. नामिबिया विरुद्धच्या सामन्यात आघाडीची फळी अपयशी ठरूनही जिम्मी निशम आणि ग्लेन फिलिप्स यांनी न्यूझिलंडचा डाव सावरत संघाला एक आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली होती. तसेच गोलंदाजीतही ट्रेेंट बोल्ट, टीम साऊदी, ॲडम मिल्ने हे वेगवान गोलंदाजीचे त्रिकूट सुरुवातीला बळी मिळविण्यात यशस्वी ठरत आहे. तर फिरकी गोलंदाज मिचेल सॅँटनर आणि ईश सोढी मध्यल्या षटकांमध्ये टिच्चून मारा करत आहेत. न्यूझिलंडसाठी जमेची बाजू म्हणजे आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये त्यांचा एक तरी फलंदाज संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी करताना दिसतो आहे.
दुसरीकडे अफगाणिस्तानला जर न्यूझिलंडला नमवायचे असेत तर त्यांना फलंदाजीत विशेष कमाल दाखवावी लागेल. कारण आतापर्यंत राशिद, मुजीब आणि नबी या फिरकीपटूंमुळे अफगाणिस्तानला विजय मिळविता आले आहेत. मात्र बलाढ्य न्यूझीलंडला नमविण्यासाठी अफगाणिस्तानला केवळ या फिरकी गोलंदाजांवर अबलंबून राहून चालणार नाही. त्यांना फलंदाजीतही विशेष चमक दाखवावीच लागेल.
अफगाणिस्तानसाठी फिरकीपटू मुजीबची दुखापत हा चिंतेचा विषय आहे. कारण भारताविरुद्धच्या सामन्यात मुजीबची कमी अफगाणिस्तानला प्रकर्षाने जाणवली. त्यामुळे अफगाणिस्तानचे गोलंदाज विरुद्ध न्यूझिलंडचे फलंदाज असा जरी आजचा सामना असला तरी विजय मिळविण्यासाठी अफगाणिस्तानच्या फलंदाजांनाही न्यूझिलंडच्या गोलंदाजांचा समर्थपणे सामना करावाच लागेल. तीन संघांचे भवितव्य ठरविणारा हा सामना असल्याने संपूर्ण क्रिकेटजगताचे या सामन्याकडे विशेष लक्ष असणार आहे.
खेळ आकड्यांचा
स्काॅटलंड विरुद्धच्या मोठ्या विजयानंतर नेट रनरेटच्या बाबतीत भारत आघाडीवर आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात जर अफगाणिस्तानने न्यूझीलंडला पराभूत केले तर या दोन्ही संघांचे समान गुण होतील. शिवाय सोमवारच्या सामन्यात भारताने जर नामिबियाला हरविले तर भारताचे या दोन संघांइतकेच गुण होतील. अशा वेळी ज्या संघाचा नेट रनरेट जास्त असेल त्यालाच उपांत्य फेरीचे तिकीट दिले जाईल. त्यामुळे आजचा न्यूझीलंडचा पराभव हा भारतीयांच्या आशा वाढविणारा ठरणार आहे.
न्यूझीलंड विरुद्धच्या आजच्या सामन्यातील अफगाणिस्तानचा विजय हा भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी जीवन-मरणाचा प्रश्न बनला आहे. कारण समाजमाध्यमांवरील चाहत्यांच्या प्रतिक्रियाच याची अनुभूती देत आहेत. सध्या या सामन्यासंबंधी अनेक मीम व्हायरल झाले आहेत. या मीममधून अफगाणिस्तानचा विजय भारतासाठी किती महत्त्वाचा आहे, हे मजेशीर पद्धतीने सांगण्यात आले आहे. एक चाहता अफगाणिस्तानला म्हणतो, ‘ये दोस्ती हम नही तोंडेंगे’.
यात धर्मेंद्रच्या जागी अफगाणिस्तान संघाचा फोटो आणि अमिताभच्या जागी भारतीय संघाचा फोटो लावण्याचा प्रतापही करण्यात आला आहे. तर दुुसरा चाहता याच गाण्याला धरून पुढे म्हणतो की, ‘तेरी जीत मेरी जीत, तेरी हार मेरी हार, सुनले मेरे यार’. यानंतर अर्णब दास या चाहत्याने तर कमालच केली, पुकार चित्रपटातील लता दीदींनी गायलेले ‘एक तू ही सहारा नही कोई हमारा’ या गाण्याची क्लीप पोस्ट करत अफगाणिस्तान संघाच्या फोटोसमोर प्रार्थनाच सुरू केली.
अफगाणिस्तान जिंकले तर अनेक शंका उपस्थित होतील - शोएब
भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा या आज होणाऱ्या न्यूझीलंड-अफगाणिस्तान सामन्यावर अवलंबून आहे. मात्र या सामन्याशी काही देणे-घेणे नसतानाही पाकिस्तानच्या माजी खेळाडूंच्या पोटात दुखायला सुरुवात झाली आहे. या सामन्याचा निकालासंदर्भात बोलताना शोएब अख्तर म्हणाला की, ‘जर या सामन्यात अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केला तर अनेक प्रश्न उपस्थित होतील. परत ‘एका’ गोष्टीची जोरात चर्चा सुरू होईल.’ शोएबला या वाक्यात मॅच फिक्सिंग असे म्हणायचे होते. मात्र थेट बोलणे टाळत त्याने उगाच नव्या वादाला तोंड फोडले आहे.