जेसन रॉय व जोस बटलर यांनी नेदरलँड्सच्या गोलंदाजांची धुलाई करताना तिसऱ्या वन डे सामन्यात इंग्लंडला ८ विकेट्स व जवळपास २० षटकं हातची राखून विजय मिळवून दिला. इंग्लंडनं तीन सामन्यांची ही मालिका ३-० अशी सहज खिशात घातली. रॉयने १०१ धावांची खेळी करताना वन डेतील १०वे शतक पूर्ण केले, तर बटलरने नाबाद ८६ धावा केल्या. नेदरलँड्सचा संघ ३ बाद २०३ वरून सर्वबाद २४४ असा गडगडला. इंग्लंडने हे लक्ष्य ३०.१ षटकांत दोन विकेट्सच्या मोबदल्यात पार केले.
वन डे वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंडने २० षटकं राखून बाजी मारली. रॉयने ८६ चेंडूंत शतक पूर्ण केले. फिल सॉल्टने ४९ धावा केल्या, तर बटलर ६४ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ८६ धावा चोपल्या. इंग्लंडच्या डेव्हिड विलीने ३६ धावांत ४, ब्रेडन कार्सने ४९ धावांत २ विकेट्स घेतल्या. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने ४ बाद ४९८ धावा करून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला होता. बटलरने त्या सामन्यात नाबाद १६२ धावांची खेळी केली होती. या मालिकेत बटलर व फिल सॉल्ट यांनी प्रत्येकी २४८ धावा केल्या.
या मालिकेत बटलरने दमदार खेळ करताना MS Dhoniचा १७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. एकाच वन डे मालिकेत यष्टिरक्षक-फलंदाजांने सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावावर होता. आता तो बटलरच्या नावे नोंदवला गेला आहे. या मालिकेत बटलरने १९ षटकार खेचले. महेंद्रसिंग धोनीने २००५ साली श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत १७ षटकार खेचले होते. २०१५मध्ये एबी डिव्हिलियर्स वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत १६ षटकारांसह धोनीच्या विक्रमाच्या आसपास पोहोचला होता. २०१९मध्ये बटलरने वेस्ट इंडिजविरुद्ध १४ षटकार खेचले होते.