केपटाऊन : वृद्धिमान साहाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात १० झेल घेत एका कसोटी सामन्यात सर्वाधिक बळींचा भारतीय विक्रम नोंदवला. साहाने दोन्ही डावांमध्ये प्रत्येकी पाच झेल टिपले. एका सामन्यात १० किंवा त्यापेक्षा अधिक झेल टिपणारा तो जगातील पाचवा यष्टिरक्षक ठरला.
इंग्लंडचा जॅक रसेल व दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स यांच्या नावावर एका सामन्यात प्रत्येकी ११ झेल टिपण्याचा विक्रम आहे, तर इंग्लंडचा बॉब टेलर आणि आॅस्ट्रेलियाचा अॅडम गिलख्रिस्ट यांनी एका सामन्यात प्रत्येकी १० झेल टिपण्याचा पराक्रम केला आहे. साहा या यादीत स्थान मिळवणारा पाचवा यष्टिरक्षक आहे.
भारताततर्फे यापूर्वी एका सामन्यात सर्वाधिक बळींचा विक्रम महेंद्रसिंह धोनीच्या नावावर होता. त्याने आॅस्ट्रेलियाविरुद्ध २०१४ मध्ये मेलबोर्न येथे ९ बळी (८ झेल व एक यष्टिचित) घेतले होते. योगायोग असा, की धोनीची ही अखेरची कसोटी होती. नयन मोंगियाने दोनदा (दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १९९६ मध्ये डर्बन येथे आणि पाकिस्तानविरुद्ध १९९९ मध्ये कोलकाता येथे) प्रत्येकी ८ झेल टिपले आहेत.
धोनीने तीन अन्य सामन्यांमध्ये ८-८ बळी घेतले आहेत. त्याने आॅस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्ये २००८ मध्ये सात झेल व एक यष्टिचित, बांगलादेशविरुद्ध ढाका येथे २०१० मध्ये आणि वेस्ट इंडिजविरुद्ध मुंबई येथे २०११ मध्ये सहा झेल व दोन यष्टिचित अशी कामगिरी केली होती.
साहाने या सामन्यात १० झेल टिपत भारतातर्फे सर्वाधिक बळी घेणाºया अव्वल पाच यष्टिरक्षकांमध्ये स्थान मिळवले. ३२वा कसोटी सामना खेळणाºया साहाच्या नावावर आता ८५ बळींची (७५ झेल व १० यष्टिचित) नोंद आहे. त्याने फारुख इंजिनियर (४६ कसोटी, ८२ बळी) यांना पिछाडीवर सोडले. भारतातर्फे साहापेक्षा अधिक बळी धोनी (२९४), सय्यद किरमाणी (१९८), किरण मोरे (१३०) आणि नयन मोंगिया (१०७) यांच्या नावावर आहेत. (वृत्तसंस्था)
Web Title: Most Victims New Record in Saha's One Match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.