गुरुवारपासून धर्मशाला येथे होणारा भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना हा भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचा कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना असणार आहे. अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये नुकताच ५०० बळींचा टप्पाही ओलांडला आहे. दरम्यान, याच कसोटी मालिकेत राजकोट येथे झालेल्या सामन्यावेळी अश्विन कसोटी अर्ध्यावर सोडून घरी परतला होता. आईची प्रकृती बिघडल्याने अश्विन तातडीने घरी गेला होता. दरम्यान, धर्मशाला कसोटीपूर्वी अश्विन त्या दिवसाची आठवण सांगताना म्हणाला की, माझी आई आयसीयूमध्ये वारंवार बेशुद्ध पडत होती. जेव्हा तिने मला बेडजवळ पाहिले तेव्हा तिच्या मनात एकच प्रश्न होता की तू इथे का आला आहेस?
रवीचंद्रन अश्विन नुकताच अनिल कुंबळे याच्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये ५०० बळी टिपणारा दुसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. राजकोट कसोटीदरम्यान, अश्विन आईची प्रकृती बिघडल्यानंतर सामना अर्ध्यावर सोडून चेन्नई येथे परतला होता. अश्विनची आई बेशुद्ध झाली होती. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते. आता १०० वा कसोटी सामना खेळण्यापूर्वी त्या घटनेबाबत सांगितले की, जेव्हा मी रुग्णालयात पोहोचलो तेव्हा माझी आई वारंवार बेशुद्ध पडत होती. तिने मला तिथे पाहिले तेव्हा तिने मला जी गोष्ट पहिल्यांदा विचारली ती म्हणजे तू इथे का आला आहेस. ती जेव्हा पुन्हा शुद्धीवर आली तेव्हा तिने सांगितले की, मला वाटते की, कसोटी सामना सुरू असल्याने तू परत गेलं पाहिजे.
यावेळी अश्विनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीसाठी आई-वडिलांनी केलेल्या त्यागाचीही आठवण काढली. अश्विन म्हणाला, माझं सगळं कुटुंब क्रिकेट आणि माझ्या करिअरला अधिक सुखकर बनवण्यासाठी बनलं आहे. हे सोपं नाही आहे. ही बाबत त्यांच्यासाठी खूप कठीण होती. माझं वय आता ३५ हून अधिक आहे. तरीही माझे वडील मी पहिलाचा सामना खेळत असल्यासारख्या उत्सुकतेने क्रिकेट सामना पाहतात. त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वपूर्ण आहे. जर तुलना करायची झाल्यास माझे क्रिकेट सामने माझ्यापेक्षा त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचे असतात, असेही अश्विनने सांगितले.