IND vs AUS T20 Series : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. आगामी मालिकेतून वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली असून नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी आहे, तर ऋतुराज गायकवाडकडे उप कर्णधारपदाची धुरा आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी संजू सॅमसन आणि युझवेंद्र चहलला संधी न मिळाल्याने खासदार शशी थरूर यांनी आवाज उठवला. सॅमसनचा अनुभव सूर्यकुमारपेक्षा अधिक असल्याने त्याचा विचार व्हायला हवा होता, असे थरूर यांनी सांगितले.
शशी थरूर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एका पोस्टवर व्यक्त होताना आपला संताप व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, मला हे अजिबात समजत नाही... संजू सॅमसनला वगळण्यात आलं, किंबहुना वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत त्याच्याकडे कर्णधारपद सोपवायला हवं होतं. त्याने केरळ आणि राजस्थान रॉयल्सच्या संघाचे नेतृत्व केले आहे. 'सूर्या'च्या तुलनेत सॅमसनचा अनुभव देखील अधिक आहे. आमच्या निवडकर्त्यांनी हे सांगायला हवं की, युझवेंद्र चहलला देखील का संधी मिळाली नाही?
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघ -सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उप कर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार.