देशभरात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह दिसून येत असून अयोध्या नगरी सजली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते रामललची प्राणप्रतिष्ठा होणार असून देशभरात दिवाळी साजरी करण्याचं आवाहनही मोदींनी केलं आहे. तत्पूर्वी, नाशिकमधील काळाराम मंदिरात मोदींनी स्वच्छतेची सेवा देत मंदिर परिसरात स्वच्छता केली होती. तसेच, देशातील नागरिकांनीही मकर संक्रांतीपासून २२ जानेवारीपर्यंत स्वच्छ मंदिर अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहनही केले होते. मोदींच्या या आवाहनाला भाजपा नेते प्रतिसाद देत असून भाजपा खासदार आणि माजी क्रिकेटर गौतम गंभीरनेही मंदिर परिसर स्वच्छ केला.
आपल्या श्रद्धा आणि पुजास्थळांची स्वच्छता मनाला प्रसन्नतेसोबतच एक आध्यात्मिक अनुभूती देते. प्रभू श्री रामाच्या अयोध्येतील आगमनामुळे एका नव्या युगाची सुरुवात होत आहे. याच अनुषंगाने पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या या मंदिर स्वच्छता अभियानात सहभागी होऊन भाजपा नेते स्वच्छतेत योगदान देत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईची आराध्य देवी आई मुंबादेवी मंदिर येथे दर्शन घेऊन परिसराची साफसफाई केली होती. आता, भाजपा खासदार गौतम गंभीरनेही दिल्लीतील करोल बाग येथील शिव मंदिरात जाऊन साफ-सफाई केली. गौतम गंभीर मंदिर परिसरातील फरशी पुसून घेताना व्हिडिओत दिसून येत आहे.
राम मंदिर पाहायला जाणार
टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. गंभीर त्याच्या रोखठोक आणि अचूक विश्लेषणासाठी ओळखला जातो, ज्यामुळे कधीकधी सोशल मीडियावर तो टीकेचा धनीही होतो. गंभीरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपल्या चाहत्यांशी प्रश्नोत्तर सत्रात गप्पा मारल्या. त्यावेळी त्याने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. त्यात एक प्रश्न हा राम मंदिराबद्दलचा होता. त्यावरही मुक्तपणे उत्तर दिले होते. दरम्यान एका यूजरने गंभीरला विचारले की, शेकडो वर्षांनी अयोध्येत राम मंदिर बनणार आहे, तुम्ही राम मंदिर पाहायला जाणार का?, या प्रश्नाच्या उत्तरात गंभीर म्हणाला, "हो नक्कीच. ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे. यामध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि यासाठी माननीय पंतप्रधानांचे आभार मानतो.", असे गंभीरने म्हटले होते.
Web Title: MPs 'serious' on Modi's call; Went to this temple and cleaned it delhi shiv mandir of karol baug
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.