नवी दिल्ली : दिग्गज सुनील गावसकर यांनी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट कर्णधार संबोधले. त्याच्यासारखा कर्णधार ‘भूतकाळात झाला नाही आणि भविष्यातही होणे नाही,’ या शब्दात गावसकरांनी स्वत:चे मत मांडले.
धोनीने यंदाच्या सत्रात १२ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या लढतीत कर्णधार या नात्याने २०० वा सामना खेळण्याचा विक्रम नोंदविला. ४१ वर्षांचा धोनी असा विक्रम नोंदविणारा आयपीएलचा पहिलाच कर्णधार आहे. त्याचा संघ मात्र त्या सामन्यात तीन धावांनी पराभूत झाला होता. गावसकर म्हणाले, ‘कठीण स्थितीतून बाहेर निघण्याची कला सीएसकेला अवगत आहे. हे केवळ धोनीच्या नेतृत्वामुळेच शक्य होऊ शकले. २०० सामन्यांत नेतृत्व करणे एकूण कठीणच. इतक्या सामन्यात नेतृत्वाच्या ओझ्याखाली स्वत:ची कामगिरी खराब होऊ शकते. मात्र माही वेगळ्या प्रकारचा कर्णधार आहे. त्याच्यासारखा कर्णधार कधी झालेला नाही आणि कधीही होणार नाही.’
आयपीएलमध्ये २००८ पासूनच धोनी सीएसके संघात आहे. यादरम्यान २०१६-१७ ला सीएसके संघाला निलंबित करण्यात आले. त्याचवेळी धोनीने १४ सामन्यांत पुणे सुपरजायंट्सचे नेतृत्व केले होते. अशाप्रकारे आयपीएलमध्ये २१४ सामन्यात नेतृत्व करण्याचा मान त्याला जातो. धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने चारवेळा जेतेपद पटकाविले आहे. सीएसकेचा कर्णधार म्हणून त्याचा रेकॉर्ड १२० विजय आणि ७९ पराभव असा आहे. एका सामन्याचा निकाल लागला नव्हता.