महेंद्रसिंग धोनीच्या जबरा फॅनने गुरूवारी आत्महत्या केली. २०२० मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि धोनीचा कट्टर समर्थक म्हणून त्याने ओळख मिळवली होती. धोनीच्या या चाहत्याने कॅप्टन कूलसाठी आपल्या संपूर्ण घराला पिवळा रंग दिला होता. २०२० मध्ये धोनीचा हा जबरा फॅन सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. तमिळनाडूतील अरंगूर येथे धोनीचा हा चाहता त्याच्या घरात मृतावस्थेत आढळला. धोनीच्या या चाहत्याचे नाव गोपी कृष्णनन होते. या प्रकरणात जुने वैमनस्य असल्याचा संशय असल्याचा स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने 'इंडियन एक्सप्रेस' या वृत्तसंस्थेला सांगितले. पोलिसांनी सांगितले की, ३४ वर्षीय कृष्णनने पहाटे साडेचारच्या सुमारास आत्महत्या केली.
मृत कृष्णननच्या भावाने सांगितले की, कृष्णनन आणि शेजारील गावातील काही लोकांचा पैशांवरून वाद सुरू होता. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यात भांडण झाले होते, ज्यामध्ये त्याला दुखापत झाली होती. यानंतर कृष्णनन खूप निराश होता. रामनाथम पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.
दरम्यान, कृष्णननचा २०२० मध्ये एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्याने त्याच्या घराला सीएसकेमय केल्याचे पाहायला मिळते. हा व्हिडीओ कॅप्टन कूल धोनीकडेही पोहोचला होता. कृष्णननने त्याच्या घराला पिवळा रंग दिल्याचे पाहताच धोनीने आनंद व्यक्त केला. माहीने त्याचे कौतुक करताना त्याच्या अप्रतिम कौशल्याला दाद दिली.
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा विद्यमान कर्णधार महेंद्रसिंग धोनी सोशल मीडियापासून दूर असतो. पण प्रसिद्धीच्या झोतात कायम असलेला माही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतो. त्याची पत्नी साक्षी धोनीच्या चाहत्यांना त्यांच्या लाडक्या माहीची झलक दाखवत असते. धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केले.