भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला जबर दणका दिला आहे. बीसीसीआयने खेळाडूंसाठी नवी आर्थिक कराराची यादी आज जाहीर केली. या यादीत काही मोठे बदल करण्यात आले आहेत. आर्थिक कराराच्या A+ या टॉप कॅटेगरीमध्ये महेंद्रसिंग धोनी, रविचंद्रन अश्विनला स्थान देण्यात आलेलं नाही. दोघांना A श्रेणीत ठेवण्यात आलंय तर विराट कोहलीसह 5 खेळाडूंना A+ या टॉप कॅटेगरीमध्ये स्थान मिळालं आहे. विशेष म्हणजे पत्नीने केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या मोहम्मद शमीला आर्थिक कराराच्या यादीतून बाहेर करण्यात आलं आहे. यापूर्वी आर्थिक कराराच्या यादीत केवळ A,B आणि C या तीन श्रेणी होत्या. पण यंदा सिनीअर खेळाडूंसाठी बीसीसीआयने A+ हा नवीन गट तयार केला आहे. A+ श्रेणीमध्ये 5 खेळाडूंचा समावेश आहे. तर A,B आणि C या तीन श्रेणींमध्ये 7-7 खेळाडूंचा समावेश आहे. A+ श्रेणीतील खेळाडूंना वर्षाला 7 कोटी रूपये मानधन मिळेल, तर A श्रेणीतील खेळाडूंना 5 कोटी, B आणि C श्रेणीतील खेळाडूंना एक-एक कोटी रूपये मिळतील. A+ श्रेणी – विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, शिखर धवन, आणि भुवनेश्वर कुमारA श्रेणी – महेंद्रसिंह धोनी, आर. आश्विन, रविंद्र जाडेजा, वृद्धिमान साहा, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे.B श्रेणी – लोकेश राहुल, दिनेश कार्तिक,उमेश यादव, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, हार्दिक पांड्या, इशांत शर्मा. C श्रेणी – सुरेश रैना, केदार जाधव, मनिष पांडे, अक्षर पटेल, करुण नायर, जयंत यादव, पार्थिव पटेल.
-महिला क्रिकेटमध्ये विश्वचषकाची स्टार मिताली राज, झूलन गोस्वामी, हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना या खेळाडूंना सर्वात अव्वल श्रेणी देण्यात आली असून सर्वांना वर्षाकाठी ५० लाख मिळतील.- पूनम यादव, वेदा कृष्णमूर्ती, राजेश्वरी गायकवाड, एकता बिश्त, शिखा पांडे आणि दीप्ती शर्मा या सर्व खेळाडू ब श्रेणीत असून सर्वांना ३० लाख दिले जातील.- क श्रेणीत मानसी जोशी, अनुजा पाटील, मोना मेश्राम, नुसहत परवीन, सुषमा वर्मा, पूनम राऊत, जेमिमा रॉड्रिग्ज, पूजा वस्त्रकार आणि तानिया भाटिया यांचा समावेश करण्यात आला आहे. सर्वांना वर्षाकाठी दहा लाखांची रक्कम दिली जाईल.