Join us  

Video: आसू अन् हसू... धोनी झाला 'इमोशनल', लेकीकडून मिळाली जादू की झप्पी

MS Dhoni Viral Video: धोनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रसिद्ध आहे पण काल त्याला ते जमलं नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 11:59 AM

Open in App

MS Dhoni emotional video: फोटो बोलतात, म्हणूनच म्हणतात की एक फोटो हजार शब्दांचे काम करतात. जर तुम्हाला चित्रांची भाषा समजून घ्यायची असेल, तर तुम्ही IPL 2023 च्या फायनलची चित्रे पाहू शकता. त्या विजयाच्या वेळेचा इमोशनल व्हिडीओ पाहू शकता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला अंतिम सामन्याच्या थराराची आपोआपच कल्पना येईल. फोटो व्हिडीओंमध्ये धोनीच्या भावनांच्या अनेक छटा आहेत. विजयाच्या आनंदात उड्या मारणारे जाडेजाचे हावभाव आहेत. पराभवानंतर हार्दिक पांड्याच्या चेहऱ्यामागे लपलेलं दु:ख आणि निराशा लपवणारे हास्य आहे. म्हणजेच तुम्हाला सामन्याच्या थराराची पूर्ण अनुभूती या व्हिडीओतून नक्की येऊ शकेल.

धोनीबद्दल एक गोष्ट खूप प्रसिद्ध आहे, तो आपल्या भावनांवर खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवतो. पण, IPL 2023च्या फायनलचा थरार असा होता की, धोनीच्या चेहऱ्यावरही त्या गोष्टीचे टेन्शन दिसू लागले होते. धोनीचा चेहरा ज्यांनी वाचला, त्यांना सामन्याचा थरार नक्कीच समजू शकला असेल. पहिल्यांदाच मैदानावर धोनी कधी आनंदी तर कधी उदास मूडमध्ये दिसला. शेवटच्या 2 चेंडूत 10 धावा करायच्या होत्या तेव्हा धोनी तणावात होता. त्या तणावातून जाडेजा विजय मिळवून दिल्यानंतर धोनीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्याने आनंदाने जाडेजाला मिठी मारली.

चॅम्पियन झाल्यानंतर धोनीने पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा यांना मिठी मारली. संघातील सदस्याची भेट घेतल्यानंतर धोनी त्याच्या कुटुंबाजवळ पोहोचला. पत्नी साक्षीने आधी त्याला आलिंगन दिले. त्यानंतर मुलगी झिवाने त्याला मिठी मारली. या सगळ्या दरम्यान धोनी थोडा भावूक झाल्याचे दिसले. आपल्या कुटुंबीयांना भेटल्यानंतर धोनीने सहकारी खेळाडूंच्या कुटुंबियांचीही भेट घेतली, त्यांच्यासोबत वेळ घालवला.

धोनीने त्यानंतर सपोर्ट स्टाफची भेट घेतली. संघातील उर्वरित खेळाडूंची भेट घेतली. तेव्हाही त्याचा चेहरा वेगळीच कहाणी सांगताना दिसत होता. त्याने गुजरात टायटन्सच्या खेळाडूंची भेट घेतली, बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी हस्तांदोलनही केले. धोनी सर्वांना भेटत होता जणू काही हे त्याचे शेवटचे आयपीएल आहे. पण त्यानंतर त्याने अजून एक हंगाम खेळण्याची शक्यता वर्तवली. त्यामुळे आता धोनी आणखी एक हंगाम खेळणार का? हे येणारा वेळच सांगू शकेल.

टॅग्स :आयपीएल २०२३महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सरवींद्र जडेजा
Open in App