भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधारमहेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा झारखंडचा सर्वात मोठा वैयक्तिक करदाता बनला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळायला लागल्यापासून पुन्हा एकदा झारखंडमधून दरवर्षी सर्वाधिक वैयक्तिक कर भरण्याचा धोनीने विक्रम केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्रसिंग धोनीने २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी आगाऊ कर म्हणून ३८ कोटी रुपये आयकर विभागाला भरले आहेत. तर गेल्या वर्ष २०२१-२२ मध्ये देखील धोनीने ३८ कोटी रुपये आयकर भरले आहेत. धोनीचं वार्षिक उत्पन्न सुमारे १३० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. दोन्ही वर्षात सारख्याच रकमेचा भरणा झाल्यामुळे धोनीची ब्रँड व्हॅल्यू बाजारात कायम असली तरी त्याचे उत्पन्न वाढले नसल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. गेल्या वर्षी देखील महेंद्रसिंग धोनी झारखंडचा सर्वात मोठा वैयक्तिक आयकर भरणारा म्हणून समोर आला होता.
धोनी पुढील स्त्रोतांमधून कमाई-
- सर्वात मोठा ब्रँड म्हणजे टीम इंडियाचा माजी कर्णधार म्हणून त्याची ब्रँड व्हॅल्यू.
- याशिवाय धोनी अनेक उत्पादनांची प्रसिद्धी करतो.
- धोनी त्याच्या मनोरंजन कंपनीतून कमाई करतो.
- याशिवाय क्रिकेट कोचिंगसाठी स्थापन केलेल्या कंपनीचे उत्पन्नही आहे.
- धोनीने शिक्षण क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे.
धोनीच्या उत्पन्नाचे इतरही अनेक स्त्रोत आहेत. त्याने अधिकृत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याचा आयपीएलमधील प्रवास आजही सुरू आहे. विशेष म्हणजे सध्या दक्षिणेत धोनीला अभिनेता रजनीकांतसारखा देवाचा दर्जा मिळाला आहे.