विशाखापट्टणम, आयपीएल 2019 : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स आठव्यांदा इंडियन प्रीमिअर लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी सज्ज झाली आहे. गतविजेत्या चेन्नईला क्वालिफायर 2 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा सामना करावा लागणार आहे. या सामन्यात CSK आणि धोनी या दोघांनाही विक्रमाची नोंद करण्याची संधी आहे.
आयपीएलमध्ये विजयाचे शतक साजरे करण्यासाठी चेन्नईला केवळ एक विजय हवा आहे. चेन्नईने 163 सामन्यांत 99 विजय मिळवले आहेत आणि त्यांचा विजयाची टक्केवारी ( 61.41%) ही अन्य संघापेक्षा चांगली आहे. त्यामुळे चेन्नईने आज दिल्लीवर विजय मिळवल्यास आयपीएलमध्ये 100 सामने जिंकणारा तो मुंबई इंडियन्सनंतर दुसरा संघ ठरणार आहे. मुंबईने 186 सामन्यात 106 विजय मिळवले आहेत. याच सामन्यात धोनीलाही एक विक्रमाची संधी आहे. या सामन्यात तीन बळी टिपल्यास आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी टिपणारा यष्टिरक्षकाचा मान त्याला मिळेल. कोलकाता नाईट रायडर्सचा दिनेश कार्तिक 131 बळींसह आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी यष्टिरक्षक आहे. धोनीच्या नावावर 129 बळी आहेत आणि त्यात 91 झेल व 38 यष्टिचीतचा समावेश आहे.
चेन्नईने चेपॉकवर दिल्ली कॅपिटल्सला 80 धावांनी नमवून पहिल्या दोन स्थानांवर येण्यापासून रोखले होते. आता क्वालिफायर-2 मध्ये पुन्हा एकदा दिल्लीपुढे चेन्नईचाच अडथळा असेल. बुधवारी एलिमिनेटरमध्ये अखेरच्या षटकात तणावपूर्ण स्थितीत दिल्लीला विजय मिळवून देण्यात रिषभ पंतची निर्णायक भूमिका राहिली. दुसरा सलामीवीर पृथ्वी शॉ याने ५६ धावा ठोकून विजयी पाया रचला होता. दिल्ली संघ या मैदानावर एलिमिनेटर सामना खेळला असल्याने चेन्नईच्या तुलनेत खेळपट्टी आणि परिस्थितीचा लाभ त्यांना मिळू शकतो. दिल्लीचे फलंदाज येथील खेळपट्टीवर चेन्नईचे फिरकी गोलंदाज हरभजनसिंग आणि इम्रान ताहिर यांचा मारा कसा खेळतात, यावर त्यांची वाटचाल अवलंबून असेल.
दुसरीकडे, चेन्नईला मोठ्या लढतींची सवय आहे. हा संघ तीनदा विजेता, तर चारवेळा उपविजेता राहिला आहे. असे असले तरी, पहिल्या क्वालिफायरमध्ये त्यांचा मुंबई इंडियन्सकडून पराभव झाला. यानंतर निराश झालेल्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीने फलंदाजांकडून खेळपट्टी समजून धावा काढण्याची अपेक्षा व्यक्त केली. मुंबईविरुद्ध घरच्या मैदानावर खेळपट्टी समजून घेण्यात आम्ही अपयशी ठरल्याची कबुली धोनीने दिलीच आहे. याशिवाय खराब फटक्यांची निवड केल्याने त्याने सहकारी फलंदाजांची कानउघाडणीही केली होती.
Web Title: MS Dhoni, Chennai Super Kings on cusp of history against Delhi Capitals in IPL 2019 Qualifier 2
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.