MS Dhoni: आयपीएलच्या २०२३च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सने विजेतेपद पटकावले. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने २०१०, २०११, २०१८, २०२१ आणि २०२३ अशी ५ आयपीएल जेतेपदं नावावर केली आहेत. मुंबई इंडियन्सनंतर आयपीएलची पाच जेतेपदं नावावर असलेला CSK दुसरा संघ ठरला आहे.
नुकतीच पार पडलेली आयपीएल धोनीची शेवटची असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून रंगली होती. यावर धोनीने देखील स्पष्टीकरण दिलं होतं. आयपीएलचे विजेतपद पटकावल्यानंतर यापेक्षा चांगला दिवस निवृत्तीसाठी असूच शकत नाही, असं धोनी मुलाखतीत म्हणाले. तसेच ज्या पद्धतीने चाहत्यांनी प्रेम दाखवलं आहे. त्यांना सध्यातरी मी फक्त धन्यवाद म्हणतो... आता चेंडू माझ्या कोर्टात आहे... ८-९ महिने आहेत आणि ते माझ्यावर आहे की तंदुरुस्ती राखून कमबॅक करतो की नाही... चेपॉकवरील पहिल्या सामन्यात सर्व माझ्या नावाची घोषणाबाजी करत होते. ते पाहून माझे डोळे पाणावले होते, असं धोनी म्हणाला.
मला डग आऊटमध्येच बसून रहावेसे वाटले. या क्षणाला मला आणखी आनंद घ्यायचाय. मी जसा आहे, तसा मी त्यांना आवडतो.. माझे पाय जमिनिवर आहेत म्हणून मी त्यांना आवडतो, असे धोनी म्हणाला. त्यामुळे धोनी आगामी आयपीएलचा हंगाम देखील खेळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र याचदरम्यान चेन्नई सुपर किंग्सने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे केलेल्या व्हिडिओमुळे धोनीने यंदाचा खेळलेला आयपीएलचा हंगाम शेवटचा होता, अशी चर्चा रंगली आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाने ट्विटवर धोनीचा स्पेशल व्हिडीओ पोस्ट केला. ३३ सेकंदाच्या या व्हिडीओत धोनीचे यंदाच्या हंगामातील खास क्षण दाखवण्यात आले आहेत. हा व्हिडीओ अल्पावधीत व्हायरल झालाय. ‘ओह कॅप्टन, माय कॅप्टन’.हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये धोनी निवृत्ती घेणार की काय अशी चर्चाही जोर धरू लागली आहे.
दरम्यान, आयपीएलमध्ये सर्वाधिक २५० सामन्यांत धोनीने ५०८२ धावा केल्या आहेत. त्यात २४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने १४२ झेल व ४२ स्टम्पिंग्सही केले आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७चा ट्वेंटी-२०, २०११ चा वन डे वर्ल्ड कप जिंकला आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली. आयसीसीच्या या तिन्ही स्पर्धा जिंकणारा तो जगातील एकमेव कर्णधार आहे. त्याने ९० कसोटींत ६ शतकं व ३३ अर्धशतकांसह ४८७६ धावा केल्या आहेत. ३५० वन डे सामन्यांत त्याच्या नावावर १०७७३ धावा आणि १० शतकं व ७३ अर्धशतकं आहेत. ९८ ट्वेंटी-२०त त्याने १९१७ धावा केल्या आहेत.
Web Title: MS Dhoni: Chennai Super Kings team posted a special video of Mahendra Singh Dhoni on Twitter.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.