इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातील सर्वाधिक व्ह्युअर्सशीप मिळालेला सामना काल नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर पार पडला. CSKच्या डावातील १९व्या षटकापर्यंत ७८ लाख प्रेक्षक असेला आकडा २०व्या षटकात ८४ लाखांपेक्षा अधिक गेला. महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) अफलातून कामगिरीने CSKला रोमहर्षक विजय मिळवून दिला. पण, या सामन्यात चेन्नईच्या खेळाडूंकडून अनेक चुका झाल्या आणि त्यामुळे समालोचक हर्षा भोगले ( Harsha Bhogle) यांनी चेन्नईचे खेळाडू आज 'नॉनस्टिक कुकवेअर'सारखे होते, असे विधान केले.
मुंबई इंडियन्सने तिलक वर्माच्या नाबाद ५१ आणि सूर्यकुमार यादव( ३२) व हृतिक शोकीन ( २५) यांच्या धावांच्या जोरावर ७ बाद १५५ धावांपर्यंत मजल मारली. चेन्नई सुपर किंग्सच्या मुकेश चौधरीने पहिल्याच षटकात रोहित शर्मा व इशान किशनला माघारी पाठवले आणि त्यानंतर डेवॉल्ड ब्रेव्हिसची विकेट घेत मुंबईचे कंबरडे मोडले. ड्वेन ब्राव्होने दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात चेन्नईची अवस्थाही वाईट झाली होती. रॉबिन उथप्पा ( ३०) व अंबाती रायुडू ( ४०) यांनी डाव सावरला, परंतु MIच्या डॅनिएल सॅम्सने ( ४-३०) तो पुन्हा कोसळवला. महेंद्रसिंग धोनीने मॅच फिनिशरची भूमिका चोख वटवताना १३ चेंडूंत नाबाद २८ धावा चोपल्या. ड्वेन प्रेटोरिसनेही २२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. चेन्नईने हा सामना ३ विकेट्स राखून जिंकला. तरीही त्यांची प्ले ऑफमध्ये जाण्याची शक्यता ही 4.87% इतकी आहे.
जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक असलेल्या रवींद्र जडेजाने काल तीन सोपे झेल सोडले, तर महेंद्रसिंग धोनीनेही स्टम्पिंग सोडली. क्रिकेट इतिहासात या दोन खेळाडूंकडून अशा चुका फार क्वचित झाल्या असाव्यात. त्यामुळे हर्षा भोगले यांनी CSKच्या खेळाडूंना हे नाव दिले.
पाहा व्हिडीओ...