मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सध्या पाच दिवसांच्या शिमला दौऱ्यावर आहे. शिमलाच्या रस्त्यांवर धोनी बुलेट राइडिंग करताना पाहायला मिळाला. एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी तो येथे आलेला आहे आणि त्याच्यासोबत सुजित सरकार व पंकज कपूरही दिसले. खाजगी विमानाने धोनी जुब्बारहट्टी विमानतळावर दाखल झाला आणि चारबारा येथे रवाना झाला. हिमाचल प्रदेशच्या सरकारने लगोलग धोनीला ' राज्याचा पाहुणा' म्हणून जाहीर केले आणि मग त्याचा हा दौरा वादात अडकला.
हिमाचल प्रदेशात भारतीय जनता पार्टीचे राज्य आहे आणि त्यांच्या या घोषणेवर काँग्रेसने आक्षेप घेत कडाडून विरोध केला. राज्यातील जनतेच्या करातून (TAX) धोनीचा खर्च उचलण्याचा हक्क भाजपाला कोणी दिला, असा सवाल उपस्थित करत काँग्रेसने हा विरोध केला. एका वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार हिमाचल प्रदेश सरकारने धोनी आणि त्याची पत्नी साक्षी यांचा सर्व खर्च उचलण्याची तयारी दर्शवली आहे.
"क्रिकेटपटू आणि एक व्यक्ती म्हणून मी धोनीचा आदर करतो. मात्र त्याच्या वैयक्तिक दौऱ्याचा खर्च राज्य सरकारने उचलणे चुकीचे आहे. अशीच वागणूक अन्य खेळाडूंना दिली जात असेल तर वादाचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र या प्रकरणात तसे काही दिसत नाही. धोनी हा क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार आहे म्हणून त्याला ही आलिशान वागणूक देणे चुकीचे आहे. त्यासाठी करदात्यांचा पैसा वापरणे हे अयोग्य आहे," अशी प्रतिक्रिया हिमाचल प्रदेशचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुखविंदर सिंग यांनी त्या वाहिनीला दिली.
कॅबिनेट मंत्री विपीन परमार यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले. ते म्हणाले," धोनी क्रिकेटपटू आहे म्हणून त्याला विशेष वागणूक दिली जाते, या आरोपात काहीच तथ्य नाही. अन्य खेळाडूंचाही पाहुणचार करायला आम्हाला आवडेल."
Web Title: MS Dhoni declared as 'State Guest' by the Himachal Pradesh government; Congress opposes
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.