Indian Premier League ( IPL 2020) मध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) निराशाजनक कामगिरीनंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) आणि केदार जाधव ( Kedar Jadhav) यांच्यावर टीका होत आहे. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात १६८ धावांचा पाठलाग करताना फ्रंट सिटवर असूनही CSKला पराभव पत्करावा लागला. सुनील नरीन आणि आंद्रे रसेल यांनी KKRसाठी विजय खेचून आणला. या पराभवानंतर कर्णधार धोनीच्या कुटुंबीयांना सोशल मीडियावरून टार्गेट करण्यात आले. सोशल मीडियावर एका नेटिझन्सनं धोनीची पाच वर्षांची कन्या झिवा हीच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले. त्यावरून अनेकांनी नाराजी प्रकट केली.
पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी यानंही या प्रकाराचा निषेध नोंदवला. त्यानं धोनी भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाची सर्वांना आठवण करून दिली. तो म्हणाला,''महेंद्रसिंग धोनी आणि त्याच्या कुटुंबीयांना नेमकी काय धमकी दिली, हे मला माहीत नाही, परंतु जे काही घडलं ते चुकीचे आहे आणि तसं घडायला नको. धोनीनं भारतीय क्रिकेटला वेगळ्या उंचीवर नेलं. त्यानं कनिष्ठ व वरिष्ठ खेळाडूंना सोबत घेऊन हा प्रवास केला आणि त्याला अशी धमकी देणं चुकीचे आहे.''
कच्छ ( पश्चिम) येथील पोलीस अधिकारी सौरभ सिंग यांनी आरोपीला अटक झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. तपासात त्यानं धमकी दिल्याची कबुली दिली. ''नमना कपाया गावातील 12वीत शिकल असलेल्या विद्यार्थ्याला तपासासाठी आम्ही अटक केली आणि त्यानं गुन्हा कबुल केला,''असे सिंग यांनी सांगितले. रांची पोलीस चौकीत गुन्हा नोंदवल्यानंतर तेथील पोलिसांनी सोशल मीडिया अकाऊंटची माहिती गुजरात पोलिसांना दिली. त्यावरून त्यांनी आरोपीचा शोध घेतला. त्याला रांची पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.