भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) आगामी बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी गुरुवारी भारतीय संघ जाहीर केला. कर्णधार विराट कोहलीला ट्वेंटी-20 मालिकेतून विश्रांती देताना बीसीसीआयनं रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवलं. या मालिकेत महेंद्रसिंग धोनीच्या पुनरागमनाकडे लक्ष लागले होते. पण, ट्वेंटी-20 संघात धोनीचं नाव नसल्यानं चाहते निराश झाले आहेत आणि पुन्हा एकदा धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात धोनीनं टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये हजेरी लावली होती. त्याच्या उपस्थितीनं चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.
वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर धोनीनं विश्रांती घेणं पसंत केले. सुरुवातीला त्यानं बीसीसीआयकडे दोन महिन्यांची विश्रांती मागितली होती, परंतु त्यात त्यानं नोव्हेंबर महिन्यापर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे तो कमबॅक करेल की नाही, याची धाकधुक चाहत्यांच्या मनाला लागली आहे. तो जानेवारी महिन्यात कमबॅक करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ''झारखंड संघाच्या वरिष्ठ संघाशी त्यानं चर्चा केली होती, परंतु सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 चषक स्पर्धेसाठी वरिष्ठ संघ जाणार आहे. त्यामुळे धोनीला आता 23 वर्षांखालील झारखंड संघासोबत सराव करावा लागणार आहे,'' असे वृत्त इंग्रजी वृत्तपत्रानं दिले आहे.
याच वृत्तानुसार धोनी पुढील वर्षी होणारा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळणार आहे. त्यामुळेच त्यानं मर्यादित षटकांच्या सामन्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. तो जानेवारी महिन्यात राष्ट्रीय संघात पुनरागमन करेल. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत वर्ल्ड कप होणार आहे. त्यादृष्टीनं धोनी सरावाला लागला आहे. त्यासाठी तो इंडियन प्रीमिअर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून तुफान फटकेबाजी करण्यासाठीही उत्सुक आहे, असे सूत्रांनी सांगितले.
श्रीलंकेविरुद्ध कमबॅक
हे वृत्त खरे ठरल्यास, डिसेंबर महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेतही धोनी टीम इंडियात दिसणार नाही. जानेवारी महिन्यात श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. यात तीन ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका होणार आहेत आणि या मालिकेतून धोनी पुनरागमन करेल. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर ट्वेंटी-20, वन डे आणि कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी रवाना होणार आहे.
Web Title: MS Dhoni to end sabbatical in January next year, to play 2020 World T20: Report
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.