IPL 2024 CSK vs LSG : चेन्नईच्या चेपॉकवर आज MS Dhoni चा जलवा पुन्हा पाहायला मिळणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातला सामना हा प्ले ऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. सध्या दोन्ही संघ ७ सामन्यांत ४ विजयांसह ८ गुणांसह तालिकेत मागे पुढे आहेत. आज जो संघ जिंकेल तो अव्वल चारमधील आपली जागा मजबूत करेल. पण, चेन्नईतील हा सामना पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनी गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. धोनीची ही कदाचीत शेवटची आयपीएल स्पर्धा असल्याची चर्चा असल्याने हजारोंच्या संख्येने धोनी चाहते स्टेडियमवर येत आहेत. चेन्नईसोडूनही इतर संघांच्या घरच्या मैदानावरही CSK चे चाहते मोठ्या संख्येने दिसत आहेत.
४ चेंडू का होईना धोनीला फलंदाजी करताना पाहण्यासाठी लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली पाहायला मिळतेय. कॅप्टन कूल धोनीने कमावलेली ही खरी संपत्ती आहे, जी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतरही त्याच्यावर फॅन्स जीव ओवाळून टाकत आहेत. फलंदाजीला धोनीची होणारी एन्ट्री स्टेडियम दणाणून सोडणारी असते. पण, धोनी फलंदाजीला येताना एक विशेष प्रकारे एन्ट्री घेतो, हे फार क्वचितच लोकांना माहित असेल. फलंदाजीला येणारा धोनी सीमा रेषेवर हलकासा थांबतो आणि उजवा पाय मैदानावर टाकतो. त्यानंतर आभाळाकडे पाहतो. धोनीचा अंधविश्वास म्हणा किंवा आणखी काही, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असतानाही तो अशीच एन्ट्री घ्यायचा...