मुंबई : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौरा गाजवल्यानंतर भारतीय संघ 11 आठवड्यानंतर मायदेशात परतणार आहेत. भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये वन डे मालिका जिंकल्या, त्याचबरोबर ऑस्ट्रेलियात 70 वर्षांत प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला. या दौऱ्यातील खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवून असलेल्या निवड समिती सदस्यांचे वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा संघ निवडण्याचे काम सोपे झाले आहे. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या दोन्ही दौऱ्यात महेंद्रसिंग धोनीला गवसलेला सूर ही खूप महत्त्वाची बाब आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत धोनीने मालिकावीराचा किताब पटकावला. त्याच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी मोठं विधान केलं आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत धोनीने 193 धावा केल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात धोनीने 33 चेंडूंत नाबाद 48 धावांची खेळी केली. त्यानंतर पुढील दोन सामन्यांत दुखापतीमुळे त्याला विश्रांती देण्यात आली. 37 वर्षीय धोनीने किवींविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-20त 39 धावा आणि दुसऱ्या सामन्यात नाबाद 20 धावा केल्या. त्याच्या या कामगिरी प्रसाद हे भारीच आनंदी झाले आहेत. ते म्हणाले,'' ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मालिकेत धोनीनं ज्या प्रकारे कामगिरी केली, त्याच्यावरून सकारात्मक संदेश ऊर्जा मिळाली आहे. त्याची ही कामगिरी आगामी स्पर्धांमध्ये कायम राहिल्यास, आम्हाला आनंद होईल.''
"आगामी वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत त्याला फार कमी सामने खेळण्याची संधी मिळत असली तरी आपल्याला जुना माही पाहायला मिळेल. त्यात तो वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी इंडियन प्रीमिअर लीगमध्येही ( आयपीएल) खेळणार आहे. त्या 14-16 सामन्यातून तो फॉर्म पुन्हा मिळवेल. वर्ल्ड कप संघात कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा हे महत्त्वाचे शिलेदार असले तरी धोनी हा हुकूमी एक्का असेल. यष्टिमागील त्याची कामगिरी आणि सामन्यात त्याच्याकडून मिळणारे मार्गदर्शन हे संघाला अत्यंत फायद्याचे ठरणारे आहे,'' असा दावा प्रसाद यांनी केली.
इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. धोनीबाबत प्रसाद पुढे म्हणाले की,'' यष्टिरक्षक आणि फलंदाज या दोन प्रमुख कारणांमुळे धोनी वर्ल्ड कप संघात महत्त्वाचा असणार आहे. यष्टिमागील त्याच्या क्षमतेबद्दल काही वादच नाही, परंतु त्याचा फलंदाजीतील फॉर्म हा थोडा चिंतेचा विषय आहे. पण, तो जास्तीत जास्त सामने खेळून फॉर्म मिळवेल, असा आम्हाला विश्वास आहे.''