मुंबई, दि. 28 - भारतीय क्रिकेट संघाचे निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी महेंद्रसिंग धोनी आपल्या खेळासाठी किती जिद्दी आणि समर्पित आहे याचा खुलासा केला आहे. एका कार्यक्रमात बोलताना एमएसके प्रसाद यांनी सांगितलं की, 'बांगलादेशमध्ये होणा-या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार होता. यावेळी धोनीच्या पाठीला दुखापत झाली होती. मात्र तरीही आराम न करता धोनीने मैदानात जाऊन पाकिस्तान संघाचा सामना केला. आपला एक पाय नसता, तरी आपण पाकिस्तानविरोधात खेळणार असं धोनीने सांगितलं होतं अशी माहिती एमएसके प्रसाद यांनी दिली आहे.
एमएसके प्रसाद यांनी संपुर्ण घटनाच समोर मांडली. धोनीबद्दल सांगताना ती घटना त्यांच्या डोळ्यासमोर अगदी तशीच्या तशी उभी राहिली होती. ते बोलले की, 'सामन्याच्या एक दिवस आधी महेंद्रसिंग धोनी जीममध्ये वर्कआऊट करत होता. धोनीने एक अवजड डंबेल उचललं आणि अचानक त्याच्या पाठीत चमक आली. चमक इतकी जोरात आली होती की, धोनी डंबेल घेऊन खाली पडला. देवाची कृपा म्हणावी ते डंबल त्याच्या अंगावर न पडता बाजूला पडलं. नाहीतर त्याला गंभीर जखम झाली असती. यामुळे धोनीला चालताना त्रास होऊ लागला. पाय जमिनीवरुन सरकवत त्याला चालावं लागत होतं. त्याने घंटी वाजवून मेडिकल स्टाफला बोलावलं. त्यानंतर स्ट्रेचवरुन त्याला नेण्यात आलं होतं'.
एमएसके प्रसाद यांनी सांगितलं की, 'या घटनेनंतर मी ढाकाला पोहोचलो तेव्हा पत्रकार मला धोनीसंबंधी प्रश्न विचारु लागले तेव्हा माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं. मी धोनीकडे गेलो आणि रिप्लेसमेंटबद्दल विचारलं. त्याने मला प्रसाद भाई काहीच चिंता करु नका असं सांगितलं. यानंतरही पुन्हा एक-दोनदा मी धोनीला विचारलं, तेव्हाही त्याने शांतपणे चिंता न करण्याबद्दल सांगितलं'.
दुस-या दिवशी पाकिस्तानसोबत सामना होता. हा सामना सर्वांसाठीच महत्वाचा होता. सामना महत्वाचा असल्याने एमएसके प्रसाद चिंताग्रस्त होते. धोनीशिवाय कसं खेळायचं ही मुख्य चिंता त्यांना लगावली होती. निवड समितीत असल्याने खेळाडू जखमी असणे खूप मोठी गोष्ट होती. यामुळेच त्यांनी धोनीच्या चिंता न करण्याच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत चिफ सिलेक्टर संदिप पाटील यांना कळवलं.
त्यांनी सांगितलं की, 'रात्री मी धोनीच्या रुममध्ये गेलो तर तो तिथे नव्हता. धोनी स्विमिंग पूलच्या बाजूला चालण्याचा प्रयत्न करत होता. नीट चालताही येत नसताना धोनी खेळण्याचा विचार कसा करु शकतो याचाच विचार मी करत होतो. सामना होणार त्यादिवशी धोनी पॅड बांधून तयार असल्याचं पाहून आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला. धोनीच्या जागी खेळण्यासाठी आम्ही पार्थिव पटेलला बोलावलं होतं. पण धोनी तर खेळण्यासाठी पुर्णपणे तयार होता. धोनीने मला रुममध्ये बोलावलं आणि तुम्ही एवढी चिंता का करत आहात असं विचारलं. जर का माझा एक पायदेखील नसेल, तरी मी पाकिस्तानविरोधात खेळेन'. यानंतर धोनीच्या नेतृत्तात मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने पाकिस्तानचा दारुण पराभव केला होता.
Web Title: MS Dhoni had said even if i would have one leg will play against Pakistan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.