नवी दिल्ली ।
महेंद्रसिंग धोनी भलेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी आज देखील त्याचा चाहता वर्ग मोठा आहे. एक चांगला विकेटकिपर, फिनिशर आणि यशस्वी कर्णधार म्हणून धोनीची जगभर ख्याती आहे. धोनीच्या खेळासोबतच त्याचा स्वभाव देखील इतरांना आकर्षित करणारा आहे. अलीकडेच याचा एक प्रत्यय देणारा किस्सा पाकिस्तानचा गोलंदाज हरिस रौफने शेअर केला आहे. ज्यामध्ये पाकिस्तानच्या गोलंदाजाने थाला धोनीकडून एक गिफ्ट मागितले होते.
दरम्यान, कॅप्टन कुल धोनीकडून गिफ्ट मागताना हरिस रौफनं एक अट देखील ठेवली होती. याचा खुलासा स्वत: हरिस रौफने ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. 'द ग्रेट क्रिकेटर्स' या यूट्यूब चॅनेलवर संवाद साधताना धोनी आणि त्याच्या मधील हा किस्सा रौफने सांगितला आहे.
मला माझं गिफ्ट मिळालं - रौफ
"मी महेंद्रसिग धोनीला मागील वर्षी टी-२० विश्वकप दरम्यान भेटलो होतो. मी तेव्हा त्याच्याकडे एक जर्सी मागितली होती. पण मला भारताची नव्हे, सीएसकेची जर्सी हवी आहे असं सांगितलं होतं. त्यानं मला जर्सी देण्याचं वचनही दिलं. अखेर मला ऑस्ट्रेलियात असताना चेन्नईची जर्सी मिळाली", असं रौफने ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मागील वर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकातील पहिल्याच बहुचर्चित सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली, भारताचा तत्कालीन कर्णधार विराट कोहली वगळता कोणत्याच फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नव्हती. कोहलीने ५७ धावांची अर्धशतकीय खेळी केली तर ऋषभ पंतने ३९ धावांची खेळी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. भारताने दिलेल्या १५२ लक्ष्याचा पाठलाग पाकिस्तानच्या संघाने एकही गडी न गमावता पूर्ण केला होता.
Web Title: MS Dhoni has gifted a CSK jersey to Pakistan bowler Haris Rauf
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.