इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2022) यंदाच्या पर्वात १० संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. लखनौ व अहमदाबाद फ्रँचायझींच्या आगमनामुळे IPL 2022 साठी मेगा ऑक्शन होणार आहे. तत्पूर्वी सर्व संघांनी ताफ्यातील काही खेळाडूंना कायम राखले आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सनंही ( CSK) महेंद्रसिंग धोनीसह रवींद्र जडेजा, मोईन अली आणि ऋतुराज गायकवाड यांना ताफ्यात कायम राखले आहे. मेगा ऑक्शनची तारीख ठरण्यापूर्वी पाकिस्तानचा गोलंदाज हॅरीस रौफ ( Haris Rauf) हा CSKच्या जर्सीत दिसणार आहे. त्यासाठी महेंद्रसिंग धोनीनं मोठं पाऊल उचललं आहे.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्ताननं विजय मिळवला होता. त्यानंतर दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांशी संवाद साधताना दिसले. पाकिस्तानच्या बऱ्याच खेळाडूंनी धोनीची भेट घेऊन त्याच्याकडून अनुभवाचे बोल जाणून घेतले. त्या सामन्यात हॅरीसनं एक विकेट घेतली होता. आज हॅरीसनं एक ट्विट करून महेंद्रसिंग धोनीचे आभार मानले आहे. भारताचा माजी आणि चेन्नई सुपर किंग्सचा आजी कर्णधार धोनीनं पाकिस्तानी गोलंदाजाला CSKची जर्सी भेट म्हणून पाठवली. त्यावर धोनीनं स्वाक्षरी केलेली दिसत आहे. हॅरीसनं CSKच्या जर्सीचा फोटो ट्विट करून धोनीचे आभार मानले आहे.
त्यानं लिहिलं की,' लीजंड व कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीचे आभार, त्यानं हे सुंदर गिफ्ट मला पाठवले. ७ क्रमांक हा आजही मन जिंकत आहे. ' त्यानं CSKचे टीम मॅनेजर रसेल यांचेही आभार मानले.
महेंद्रसिंग धोनीचा मनाचा मोठेपणा, स्वतःच्या पगारात कपात करून रवींद्र जडेजाला दिलं अव्वल स्थान
महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) आयपीएल 2022 खेळणार हे आता निश्चित झाले आहे. चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) जाहीर केलेल्या चार खेळाडूंमध्ये धोनीचं नाव दिसल्यानं सर्वांना आनंद झाला. पण, CSKनं जाहीर केलेल्या लिस्टमधून धोनीचा मनाचा मोठेपणा पुन्हा एकदा दिसला. धोनीनं स्वतःचं मानधन कमी करून अव्वल खेळाडूचा मान रवींद्र जडेजाला दिला. त्यामुळे CSKनं जाहीर केलेल्या यादीत जडेजा 16 कोटींचा मानकरी ठरला, तर धोनीनं 12 कोटीसह दुसऱ्या स्थानावर राहणे पसंत केलं. मोईन अली ( 8 कोटी) व ऋतुराज गायकवाड ( 6 कोटी) हे संघानं कायम राखलेले खेळाडू आहेत.