भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या व अंतिम सामन्यात दीपक चहरने विक्रमी कामगिरी केली. चरहनं 20 चेंडूंत 7 धावा देत 6 विकेट्स घेतल्या. त्यात अविस्मरणीय हॅटट्रिकचा समावेश आहे. भारताकडून ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा तो पहिला पुरुष क्रिकेटपटू ठरला. त्यानं या यशाचं श्रेय माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला दिले आहे.
राजस्थान संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चहरनं 2010मध्ये रणजी करंडक स्पर्धेत पदार्पणातच त्यानं हैदराबादविरुद्ध 10 धावांत 8 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर हैदराबादचा संपूर्ण संघ 21 धावांत तंबूत परतला होता आणि रणजी स्पर्धेतील ही निचांक धावसंख्या आहे. त्यानंतर दुखापतीमुळे चहरला अनेक चढउतारांचा सामना करावा लागला. त्यातून यशाचा मार्ग शोधत त्यानं टीम इंडियात स्थान पटकावलं. बांगलादेशविरुद्धच्या कामगिरीबद्दल चहर म्हणाला,''हा कामगिरीचं शब्दांत वर्णन करणं अवघड आहे. पण, भविष्यात मी जेव्हा बॅड पॅचमधून जात असेन तेव्हा त्यातून मार्ग काढण्याचा आत्मविश्वास या खेळीतून नक्की मिळेल.''
महेंद्रसिंग धोनीनं त्याच्यात विश्वास निर्माण केला. 2016मध्ये चहर रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून धोनीच्या नेतृत्वाखाली दोन सामने खेळला. त्यानंतर तो पुढील मोसमात तीन सामने स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली खेळला. त्याच्यातील कौशल्य हेरण्यासाठी धोनीला पाच सामने पुरेसे ठरले. 2018मध्ये धोनीनं त्याला चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य करून घेतलं. त्यानंतर धोनीच्या मार्गदर्शनाखाली चहरचा खेळ अधिक बहरला. 2018च्या सत्रात त्यानं 10 विकेट्स घेतल्या होत्या.
चहर म्हणाला,''महेंद्रसिंग धोनीनं मला आतापर्यंत बरीच मदत केली आहे. कामगिरीशी झगडत असतानाही मला आयपीएल खेळण्याची संधी मिळावी, अशी धोनीचीच इच्छा होती. माझ्या कारकिर्दीत धोनीचा महत्त्वाचा वाटा आहे. आज मी जे काही मिळवले आहे, ते त्याच्यामुळेच.''
Web Title: MS Dhoni has had a big part to play in what I am achieving today: Deepak Chahar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.