नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) रविवारी एक घोषणा केली आहे. आपल्या नेतृत्वाखाली भारताला दोनदा विश्वविजेता बनवणारा महान कर्णधार धोनी त्यांच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. शनिवारी धोनीने एक पोस्ट करून सर्वांचे लक्ष वेधले होते. धोनी रविवारी आयपीएलबाबत मोठी घोषणा करणार असे चाहत्यांना वाटत होते. मात्र झाले भलतेच ज्यामुळे धोनी पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.
धोनीने बिस्किट केले लॉन्च४१ वर्षीय दिग्गज धोनीने ओरियो बिस्किट लॉन्च केले आहे, याबाबत त्याने एका व्हिडीओद्वारे माहिती दिली. धोनी म्हणतो की, हे बिस्किट २०११ मध्ये भारतात आले आणि त्यानंतर भारतीय संघाने विश्वचषक देखील जिंकला. आता पुन्हा एकदा हे बिस्किट भारतात लॉन्च झाले असून त्यामुळे विश्वचषक देखील आपल्याकडे येईल. खरं तर धोनीने हे सगळं काही विनोद म्हणून म्हटले. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तेव्हाही पत्रकार परिषद झाली नव्हती.
शनिवारी केली होती घोषणाभारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शनिवारी आपल्या सोशल मीडिया पेजवर २५ सप्टेंबर रोजी लाईव्ह येणार असल्याचे सांगितले होते. यानंतर चाहत्यांनी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून ४१ वर्षीय दिग्गज खेळाडूच्या निवृत्तीचा अंदाज लावला पण अशी कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. धोनी आयपीएलबाबत मोठी घोषणा करणार यासाठी चाहते टक लावून वाट पाहत होते. मात्र सध्या तरी तो आगामी आयपीएलमध्ये खेळणार आहे.
धोनीने CSKला चार वेळा मिळवून दिली IPL ट्रॉफीIPLच्या सर्वात यशस्वी फ्रँचायझींपैकी एक असलेली चेन्नई सुपर किंग्स धोनीच्या नेतृत्वाखाली चार वेळा चॅम्पियन बनली आहे. २०२२ मध्ये IPLमध्ये संघाची कामगिरी काही खास नव्हती. हंगामाच्या सुरुवातीला धोनीने रवींद्र जाडेजाकडे कर्णधारपद सोपवले होते, मात्र संघाच्या सततच्या पराभवामुळे संघाचे नेतृत्व पुन्हा धोनीकडे आले. याशिवाय, सीझनच्या शेवटच्या सामन्यानंतर धोनीने सांगितले होते की तो आयपीएल २०२३ मध्येही CSK कडून खेळणार आहे.