मुंबई : इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघाला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. मागील वर्षभरात भारतीय संघाने वन डे क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केलेली आहे आणि त्यामुळेच अनेक माजी क्रिकेटपटूंनी भारतालाच जेतेपदाचा दावेदार घोषित केले आहे. यासह जेतेपदाच्या शर्यतीत भारताला यजमान इंग्लंड कडवी टक्कर देईल असाची विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे. यात ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज शेन वॉर्न यानेही भारत आणि इंग्लंड हे जेतेपदाच्या शर्यतीतील प्रबळ दावेदार असल्याचे मत व्यक्त केले. मात्र त्याचवेळी त्याने विराट कोहलीला वर्ल्ड कप जिंकायचा असल्यास महेंद्रसिंग धोनीची मदत घ्यावीच लागेल असेही म्हटले.
शेन वॉर्न म्हणाला,''वर्ल्ड कप स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मागील वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेतल्यात भारत आणि इंग्लंड हे संघ जेतेपदाचे प्रबळ दावेदार असतील. योग्य संघ निवड केल्यास ऑस्ट्रेलियाही बाजी मारू शकतील, परंतु भारत व इंग्लंड हे फेव्हरिट आहेत.'' वर्ल्ड कप संघात धोनीला खेळवावे की नाही, याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्याच्या बॅटीतून धावांचा ओघ आटला असला तरी यष्टिमागील त्याच्या कामगिरीला अजूनही तोड नाही. रिषभ पंतकडे पर्यायी यष्टिरक्षक म्हणून पाहिले जात असले तरी त्याला आणखी बरेच काही शिकण्याची गरज आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या वन डे सामन्यात पंतच्या ढिसाळ यष्टिरक्षणाचा फटका भारताला बसला. धोनीच्या समावेशाबद्दल वॉर्न म्हणाला,''धोनी हा महान खेळाडू आहे. संघाला गरज असल्यास तो कोणत्याही क्रमावर फलंदाजी करू शकतो. त्याच्यावर टीका करण्याचं कारणच कळत नाही. वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला त्याच्या अनुभवाची आणि नेतृत्वकौशल्याची गरज आहे. विराट कोहलीलाही त्याची गरज आहे. ''वॉर्नने कर्णधार विराट कोहलीचे कौतुक केले. तो म्हणाला,''विराट कोहली भन्नाट कर्णधार आहे, पण त्याला अनेकदा धोनीच्या अनुभवाची गरज भासते. दडपणाच्या स्थितीत कोहलीला धोनीचा सल्ला मदतीचा वाटतो. त्यामुळे सामना हातात असताना नेतृत्व करणं सोपं असतं, परंतु कठीण प्रसंगी तुम्हाला धोनीसारख्या अनुभवी खेळाडूची गरज भासतेच. विराटला वर्ल्ड कप जिंकायचा असल्यास धोनीचं संघात असणं गरजेचं आहे.''