भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. जुलै 2019 पासून धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. कोरोना व्हायरसमुळे क्रिकेट स्पर्धा बंद आहेत आणि या कालावधीत सर्व खेळाडूंना आपापल्या कुटुंबीयांना पुरेसा वेळ द्यायला मिळत आहे. धोनी त्याच्या रांचीतील फार्महाऊसवर लेक जीवासोबत धम्माल मस्ती करताना दिसत आहे. साक्षी सोशल मीडियावर धोनी आणि जीवा यांचे व्हिडीओ सतत अपलोड करत आहे. मंगळवारी जीवाच्या सोशल मीडियावर एक पोस्ट पडली. त्यानं तिनं माही आणि साक्षी यांनी पक्ष्याला कशाप्रकारे जीवदान दिलं, याची संपूर्ण हकिकत सांगितली.
जीवाच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की,''घराच्या लॉनमध्ये आज पक्षी बेशुद्ध अवस्थेत मला दिसला. मी लगेच मम्मी आणि पप्पांना सांगितले. कॅपरस्मिथ प्रजातीचा पक्षी त्यांच्या घरी आला, तो बेशुद्ध होता आणि पप्पांनी त्याला उचलून घेत पाणी पाजलं. त्याची काळजी घेतली. थोड्यावेळानंतर त्यानं डोळे उघडले. ते पाहून आम्हाला फार आनंद झाला.''
''आम्ही एका टोपलीत काही पानं ठेवली आणि त्या पक्ष्याला त्यात ठेवले. मम्मी-पप्पांनीच मला सांगितले की हा कॉपरस्मिथ आहे. बरं वाटल्यानंतर तो पक्षी अचानक उडून गेला. मला त्याला आपल्याजवळच ठेवायचे होते, परंतु मम्मीनं मला सांगितले की, तो त्याच्या आईकडे गेला आहे. तो पुन्हा येईल, मला विश्वास आहे,''असे जीवाच्या पोस्टखाली लिहिलं आहे.