भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केव्हा कमबॅक करेल, याची सर्वांना उत्सुकता आहे. जुलै 2019नंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे आणि त्यामुळे गेली 9-10 महिने त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या आहेत. इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) मधून धोनी टीम इंडियान पुनरागमन करेल, अशी सर्वांना अपेक्षा आहे. पण, कोरोना व्हायरसमुळे आयपीएलच्या 13व्या मोसमावर अनिश्चिततेच सावट आहे. आयपीएलवरील मळभ गडद होत असताना धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा जोर पकडत आहेत. त्यात शुक्रवारी धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. लॉकडाऊनमध्ये रांची येथील फार्म हाऊसवर असलेल्या धोनीला पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला..
धोनीची पत्नी साक्षी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत आहे. धोनी आणि मुलगी झिवा यांच्यात सुरू असलेली धम्माल साक्षी व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंच पोहोचवत आहे. असाच एक व्हिडीओ साक्षीनं पोस्ट केला. त्यात धोनी त्याच्या कुत्र्यासोबत खेळत आहे. यावेळी झिवाही सोबत पाहायला मिळत आहे. पण, यात धोनीचा लूक पाहून चाहते चिंतेत पडले आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चेन्नई सुपर किंग्सनं त्यांचा सराव सत्र रद्द केले आणि धोनी थेट रांचीतील घरी दाखल झाला. तो येथे मुलगी झिवासोबत धम्माल मस्ती करत आहे.
धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत.