चेन्नई-
महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएल खेळतो. या लीगमध्ये तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. धोनीचे चाहते वर्षभर आयपीएलची वाट पाहत असतात जेणेकरून त्यांना त्यांच्या 'कॅप्टन कूल'ला खेळताना पाहता येईल. धोनीच्या चाहत्यांची ही प्रतीक्षा ३१ मार्च रोजी संपणार आहे कारण या दिवसापासून आयपीएल-२०२३ सुरू होत आहे आणि पहिला सामना चेन्नईचाच आहे. गतविजेत्या गुजरात टायटन्सशी चेन्नईची लढत होणार आहे. याआधी धोनी आपल्या बॅटला धार काढताना दिसतोय. चेन्नई संघ सध्या चेपॉक येथील त्यांच्या होमग्राऊंडवर कसून सराव करत आहे.
धोनीची क्रेझ एवढी आहे की टीमच्या सरावात त्याला पाहण्यासाठी हजारो लोक पोहोचतात आणि धोनी दिसताच संपूर्ण स्टेडियम धोनीच्या नावानं दणाणून निघतो. सोमवारी चेन्नईनं धोनीचा एक व्हिडीओ ट्विट केला होता ज्यामध्ये चाहते त्याच्या नावाचा जयजयकार करत होते. आता त्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून प्रतिस्पर्धी संघाचंही टेन्शन वाढणार आहे.
एका सिक्सनं केली कमालसमोर आलेल्या धोनीच्या नवीन व्हिडिओमध्ये, धोनी फलंदाजीचा सराव करत आहे. धोनीनं फायनलमध्ये ज्या पद्धतीनं षटकार खेचला होता जवळपास तसाच लाँग-ऑनच्या दिशेनं खणखणीत षटकार सराव सामन्यात खेचला आहे. धोनीनं लगावलेला षटकार पाहता तो त्याच्या जुन्या रंगात आला आहे असं वाटतं. जर असं झालं तर प्रतिस्पर्धी संघांसाठी ही नक्कीच धोक्याची घंटा आहे. कारण धोनी फॉर्मात असला की सामना कोणत्याही परिस्थितीत असला तरी तो खेचून आणण्याची धमक त्याच्या फलंदाजीत आहे.