भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या मालिकेतून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल, असे वाटत होते. मात्र, निवड समितीनं जाहीर केलेल्या ट्वेंटी-20 आणि वन डे अशा दोन्ही संघांत धोनीचं नाव नसल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. विंडीजविरुद्ध धोनी पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रीय होऊ शकतो, अशा चर्चा होत्या. पण, आता धोनी नक्की कधी मैदानावर दिसेल, याची पुन्हा एकदा उत्सुकता लागली आहे. ताज्या माहितीनुसार धोनी मार्च 2020मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण, धोनीचं हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण टीम इंडियाकडून नसेल, अशी माहिती मिळत आहे.
वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. या कालावधीत त्याला वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत खेळता आले नाही. त्यात विंडीजविरुद्धच्या मालिकेतही त्याचा टीम इंडियात समावेश करण्यात आलेला नाही. विंडीज मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया, श्रीलंका हे संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. या तीनही मालिकेत धोनीचा संघात समावेश नसेल. इंडियन प्रीमिअर लीगच्या हंगामापूर्वी धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार आहे. बांगलादेश येथे होणाऱ्या आशियाई एकादश आणि जागतिक संघ यांच्यात दोन ट्वेंटी-20 सामने होणार आहेत. या दोन्ही सामन्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा आहे आणि यात धोनी आशियाई संघाचे प्रतिनिधित्व करण्याची शक्यता आहे. 18 आणि 21 मार्च या तारखेला हे सामने होणार आहेत.
या सामन्यांसाठी धोनीसह विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि रवींद्र जडेजा यांना आशियाई एकादश संघाचे प्रतिनिधित्व करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती बांगलादेश क्रिकेट मंडळानं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे केली होती. याच कालावधीत दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे आणि 18 मार्चला कोलकाता येथे वन डे सामना खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे विराट, बुमराह, पांड्या, भुवी, रोहित यांची आशियाई एकादश संघाकडून खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे बीसीसीआय कदाचित धोनीला या सामन्यात खेळण्याची परवानगी देऊ शकते.