MS Dhoni IPS officer: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) नेहमीच चर्चेत असतो. परत एकदा धोनी चर्चेत आला आहे, पण आता प्रकरण न्यायालयाशी संबंधित आहे. एका IPS अधिकाऱ्याने धोनीवर काही आरोप केले होते, ज्याबाबत धोनीने कोर्टात धाव घेतली होती. याप्रकरणी कोर्टाने त्या IPA अधिकाऱ्याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
बार आणि खंडपीठाच्या अहवालानुसार, मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी आयपीएस अधिकारी संपत कुमार (IPS sampat kumar) यांना 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाचा अवमान केल्याच्या आरोपावरुन ही शिक्षा सुनावण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, न्यायालयाने उत्तर दाखल करण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिल्याने अधिकाऱ्याला तात्काळ तुरुंगात टाकले जाणार नाही.
नेमकं काय प्रकरण आहे?एमएस धोनीने मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये त्याने मीडिया चॅनल, अधिकारी आणि इतर काही लोकांवर खोटे आरोप केल्याचा आरोप केला होता. धोनीवर आयपीएल 2013 च्या फिक्सिंग प्रकरणात नाव ओढल्याचा आरोप या याचिकेत होता. धोनीने या प्रकरणी कोणीही आपल्यावर आणखी निराधार आरोप करू नयेत, अशी विनंती न्यायालयात केली होती, न्यायालयानेही तसाच आदेश दिला होता.
त्यानंतर आयपीएस अधिकारी वगळता, सर्वांनी न्यायालयाचा आदेश मान्य केला. आता पुन्हा धोनीच्या टीमकडून कोर्टाला सांगण्यात आले की, त्या प्रकरणात अधिकारी अजूनही चुकीचे आरोप करत आहेत. यामुळे कोर्टाने संबंधित अधिकाऱ्याला 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.