चेन्नई सुपर किंग्सने या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांच्या दहाव्या इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. चेन्नईतील पहिल्या क्वालिफायरमध्ये CSK ने गुजरात टायटन्सचा पराभव केला. चेन्नईने चार वेळा जेतेपद उंचावले आहे. CSK चा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे ( MS Dhoni) हे यंदाचे शेवटचे आयपीएल वर्ष आहे आणि त्यामुळे संपूर्ण हंगामात त्याच्या प्रत्येक सामन्यात चाहत्यांची तौबा गर्दी पाहायला मिळाली. रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणारा सामना हा धोनीचा कदाचित शेवटचा आयपीएल सामना असू शकतो, असा अंदाज आहे. पण, चेन्नई सुपर किंग्सचा आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज मॅथ्यू हेडन याचे मत काही वेगळे आहे.
मॅथ्यू हेडनने ४१ वर्षीय धोनीबद्दल असे म्हटले की, " धोनी दुसऱ्याने फेकलेल्या कचऱ्याचे खजिन्यात रुपांतर करतो. "एमएस एक जादूगार आहे. तो दुसऱ्याचा कचरा उचलतो आणि त्यांचा खजिना बनवतो. तो एक अतिशय कुशल आणि सकारात्मक कर्णधार आहे. तामीळ नाडू क्रिकेट संघटना आणि फ्रँचायझी यांच्यातील ताळमेळ एवढे चांगले आहे की एक चांगला संघ बांधणीसाठी ते मजबूत आहे. महेंद्रसिंग धोनी म्हणजे, एखाद्या गोष्टींकडे जाण्याचा आणि त्याद्वारे कार्य करण्याचा एक पद्धतशीर मार्ग आहे. त्याने ते भारतासाठी केले आणि तो चेन्नई सुपर किंग्जसाठी करत आहे.”
ऑसी सलामीवीराने मात्र धोनीच्या CSK भविष्यावर परखड मत मांडले; त्याला वाटते की, २०२३ चा आयपीएल हा धोनीचा खेळाडू म्हणून शेवटचे पर्व असेल. “पुढच्या वर्षी तो खेळेल की नाही हे जवळजवळ अप्रासंगिक आहे. वैयक्तिकरित्या मला वाटत नाही की तो खेळेल, परंतु तो एमएस धोनी आहे,''असे हेडन म्हणाला.
धोनीने २०२४ मध्ये पुनरागमन करणार की नाही याची पुष्टी केली नाही, त्याच्या भविष्याबद्दल निर्णय घेण्यासाठी त्याच्याकडे “८-९ महिने” आहेत असे तो म्हणाला होता. "मला माहित नाही... माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी ८-९ महिने आहेत. आता ही डोकेदुखी का घ्यायची. माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ आहे. लिलाव डिसेंबरमध्ये आहे," असे ४१ वर्षीय धोनी क्वालिफायर १ सामन्यानंतर म्हणाला होता.