MS Dhoni, Droni Camera Drone: भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनी याने गरुड एरोस्पेसद्वारे निर्मित प्रगत वैशिष्ट्यांसह (Advance Features) 'द्रोणी' नावाचा 'मेड-इन-इंडिया' कॅमेरा ड्रोन आज लॉन्च केला. धोनीने ड्रोन तयार करणाऱ्या Garuda Aerospace या कंपनीत गंतुवणूक केली असल्याचे काही दिवसांपूर्वीच समजले होते. Garuda Aerospace या कंपनीचे २६ शहरांमध्ये ३०० ड्रोन्स व ५०० पायलट्स आहेत. चेन्नईच्या या कंपनीत धोनीने गुंतवणूक केल्याची माहिती सोशल मीडियावरून Garuda Aerospaceने दिली होती. याच कंपनीसाठी नव्या कोऱ्या 'द्रोणी' कॅमेरा ड्रोनचे आज धोनीने लॉचिंग केले.
धोनी हा गरुडा एरोस्पेसचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. गरूडा कंपनीने कृषी कीटकनाशक फवारणी, सौर पॅनेल साफसफाई, औद्योगिक पाइपलाइन तपासणी, मॅपिंग, सर्वेक्षण, सार्वजनिक घोषणा आणि होम डिलिव्हरी या सेवांसाठी या ड्रोनची निर्मिती करण्याचा प्रयत्न असल्याचे गरूडाने सांगितले. गरूडाने 'द्रोणी'च्या माध्यमातून ड्रोन विक्रीच्या मार्केटमध्ये प्रवेश केला आहे. कंपनीचे संस्थापक आणि सीईओ अग्निश्वर जयप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या अखेरीस हे उत्पादन बाजारात उपलब्ध होणार आहे.
चेन्नई येथील कार्यक्रमात नवीन 'किसान ड्रोन' लाँच करण्यात आला. याचा उद्देश कृषी क्षेत्रासाठी होणार आहे. विशेषत: कीटकनाशकांच्या फवारणीसाठी याचा वापर होणार आहे. हे बॅटरीवर चालणारे ड्रोन दररोज ३० एकर क्षेत्रावर कृषी कीटकनाशक फवारणी करण्यास सक्षम आहे. या कार्यक्रमात बोलताना धोनीने आठवण करून दिली की कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान त्याने शेतीमध्ये खूप रस घेतला होता. त्यामुळेच धोनीने कृषी क्षेत्रातील ड्रोनच्या भूमिकेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला.
क्रिकेटच्या निवृत्तीनंतर धोनीची व्यापारक्षेत्रात 'सेकंड इनिंग्स'
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटव्यतिरिक्त अनेक कंपनींमध्ये गुंतवणूक केली आहे. मनोरंजन क्षेत्रातही धोनीने एन्ट्री घेतली आहे. याशिवाय सेकेंड हँड कार विकणाऱ्या कार्स 24 पासून इंटीरियर डेकोरेशन कंपनी 'होमलेन'मध्येही त्याची गुंतवणूक आहे. धोनीने मागच्या वर्षी Homelane या कंपनीत गुंतवणूक केली होती. होमलेन ही कंपनी इंटीरियर डेकोरेशनचे उत्पादन तयार करते. त्यांनी धोनीसोबत तीन वर्षांचा करार केला आहे. धोनी या कंपनीचा केवळ सदिच्छादूत नाही, तर तो इक्विटी पार्टनर देखील आहे. ही कंपनी 2014मध्ये सुरू झाली आणि दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, मुंबई, कोलकातासह 16 शहरांमध्ये त्यांचा बिझनेस आहे.
याशिवाय, Khatabook या कंपनीचाही धोनी सदिच्छादूत आहे आणि यातही धोनीची भागीदारी आहे. कार्स 24मध्येही धोनीने गुंतवणूक केल्याची चर्चा आहे. फूड अँड बेव्हरेज कंपनी 7 इंकब्रूजमध्येही धोनी शेअरहोल्डर आहे. कंपनीने मागच्या वर्षी कॉप्टर 7 नावानं चॉकलेट आणि बेव्हरेजची सीरिज लाँच केली होती. माही रेजिडेन्सी नावानं झारखंड येथील रांची येथे धोनीचं हॉटेल आहे. Seven फॅशन ब्रँड, स्पोर्ट्सफिट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड यातही धोनीची गुंतवणूक आहे.