पुणे-
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या यंदाच्या सीझनमध्ये महेंद्रसिंग धोनीनं कर्णधारपद सोडलं होतं. पण आता पुन्हा एकदा त्याचं कर्णधारपदी पुनरागमन झालं आणि संघानं विजय देखील प्राप्त केला. कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर धोनी पुन्हा एकदा मैदानात आक्रमक अंदाजात पाहायला मिळाला आणि संघाचा कर्णधार म्हणून खेळाडूंना सल्ले देतानाही दिसला.
चेन्नई संघाने रविवारी सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध सामना खेळला, ज्यामध्ये १३ धावांनी चेन्नईनं हंगामातील तिसरा विजय नोंदवला. या विजयाचा हिरो ठरला वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी. धोनीनं सामन्यातील शेवटचं षटकही मुकेशला दिलं होतं. यावेळी धोनी मुकेशवर चिडलेला पाहायला मिळाला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुकेशनं टाकला वाइड चेंडू अन् धोनीचा पारा चढलासामन्यात २०३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या हैदराबाद संघाला शेवटच्या षटकात विजयासाठी ३८ धावांची गरज होती. त्यानंतर धोनीनं मुकेश चौधरीकडूनच शेवटचं षटक टाकून घेतलं. स्ट्राइकवर निकोलस पूरन होता, ज्यानं पहिल्या चेंडूवर एक षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार खेचला व १० धावा वसुल केल्या. तिसरा चेंडू निर्धावर आला. पण चौथा चेंडू लेग साइडला वाईड गेला. मग काय धोनीचा पारा चढला. त्यानं मुकेशकडे पाहून डोळे वटारले आणि अचूक टप्प्यात गोलंदाजी करण्याचा इशारा केला. धोनीनं त्याच्याजवळ जाऊन सल्लाही दिला पण पुढच्या दोन्ही चेंडूवर निकोलस पुरननं षटकार खेचले. अखेरच्या चेंडूवर फक्त एक धाव घेतली. अशाप्रकारचे अखेरच्या षटकात २४ धावा हैदराबादनं केल्या. चेन्नईनं सामना १३ धावांनी जिंकला.
धोनीनं काय म्हटलं ते मुकेशनं सांगितलं"धोनीनं मला काही स्पेशल असं सांगितलं नाही. फक्त स्टम्प टू स्टम्प गोलंदाजी करण्यास सांगितलं. काहीही वेगळं करण्याचा प्रयत्न करू नको", असं धोनीनं सांगितल्याचं मुकेशनं सामन्यानंतरच्या मुलाखतीत म्हटलं.
"मी माझ्या गोलंदाजांना सांगतो की जर तुम्हाला एका षटकात चार षटकार जरी पडले तरी तुम्हाला तुमची सर्वोत्तम गोलंदाजीच करायची आहे. कारण पुढील दोन चेंडूवर काहीही होऊ शकतं. सगळेच जण या थेअरीवर विश्वास ठेवतीलच असं नाही. पण हे खूप कामी येतं असं मला वाटतं", असं धोनी म्हणाला.
चेन्नईनं सामना १३ धावांनी जिंकलाहैदराबाद संघाविरुद्धच्या सामन्यात धोनीच्या CSK संघाने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना २ बाद २०२ धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने ५७ चेंडूत ९९ तर डेव्हन कॉनवेने ५५ चेंडूत ८५ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ ६ गडी गमावून १८९ धावाच करू शकला आणि १३ धावांनी सामना गमावला. संघाकडून निकोलस पूरनने ३३ चेंडूत ६४ तर कर्णधार केन विल्यमसनने ३७ चेंडूत ४७ धावा केल्या.