Join us  

धोनीच्या उपस्थितीमुळे कोहलीचा निम्मा भार होतो हलका, जम्बोची गुगली

कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी हे भारतीय क्रिकेट संघाचे दोन मजबूत खांब आहेत. पण मागील काही वर्ष धोनीच्या बॅटच्या भात्यातून धावांचा ओघ आटला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 12:58 PM

Open in App

मुंबई : कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी हे भारतीय क्रिकेट संघाचे दोन मजबूत खांब आहेत. पण मागील काही वर्ष धोनीच्या बॅटच्या भात्यातून धावांचा ओघ आटला आहे. मात्र, यष्टिमागे त्याच्या कर्तृत्वाला अजूनही तोड नाही. त्यामुळेचे कोहलीसाठी धोनी हा हुकुमी एक्का आहे. भारताचा महान फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेनेही धोनीचे संघात असणे कोहलीसाठी किती दिलासादायक आहे, हे सांगितले आहे. कोहलीला माजी कर्णधाराकडून नेतृत्व कौशल्याचे आणखी धडे शिकण्याची गरज आहे, असेही कुंबळे म्हणाला. 

CricketNext शी बोलताना कुंबळेने हे मत व्यक्त केले. धोनीच्या छत्रछायेखाली कोहली सर्वोत्तम कर्णधाराच्या दिशेने वाटचाल करत असल्याचेही कुंबळे म्हणाला. "धोनी संघात असला की कोहलीलाही आहे, असे वाटते. यष्टिमागे धोनीचे असणे कोहलीचा आत्मविश्वास वाढवणारे आणि अचूक निर्णय घेण्यासाठी त्याला सल्ल्याची मदत मिळते," असे जम्बोने स्पष्ट केले. 

धोनी अजूनही 'half captain' असल्याचे मत अनेक माजी खेळाडूंनी व्यक्त केले आहे आणि अनेक सामन्यांत त्याची प्रचितीही आली आहे. यष्टिमागून तो सातत्याने गोलंदाज व क्षेत्ररक्षकांशी संवाद साधत असतो आणि त्यांना मार्गदर्शन करतो. नेतृत्वगुण हे त्याच्यात जन्मजात आहेत. त्यामुळे कर्णधार या पदावर नसतानाही तो संघाच्या मदतीला सदैव उभा असतो. कुंबळे म्हणाला," तो प्रदीर्घ काळ संघाचा कर्णधार होता आणि यष्टिमागून सामन्याचा अचूक अंदाज त्याच्याशिवाय कोणी बांधूच शकत नाही. तो सातत्याने गोलंदाजांना मार्गदर्शन करत असतो. त्यानुसार क्षेत्ररक्षणातही बदल करतो. धोनीमुळे कोहलीचा निम्मा भार कमी होतो."

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत भारतीय संघाने पहिले दोन सामने जिंकले आणि त्याही सामन्यात धोनीचे नेतृत्वगुण पाहायला मिळाले." कोहली वन डे क्रिकेटमध्ये धोनीवर अधिक विसंबून आहे. विशेषतः क्षेत्ररक्षण ठरवताना कोहलीला धोनीची गरज भासते. याची उणीव ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या दोन सामन्यांत जानवली. कोहलीला सामन्याचे दडपण अजूनही हाताळता येत नाही. त्यामुळे कोहली हा धोनीवर खूपच विसंबून आहे,'' असे कुंबळे म्हणाला.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीविराट कोहलीअनिल कुंबळे