आयपीएलचा सोळावा हंगाम मैदानात आणि मैदानाबाहेर महेंद्रसिंग धोनीमुळे सर्वाधिक चर्चेत आहे. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आयपीएलला रामराम करणार का? याकडे सर्व क्रिकेट वर्तुळाचे लक्ष लागले आहे. धोनीने मात्र अनेकदा वेगवेगळी विधानं करून सस्पेन्स कायम ठेवला आहे. धोनीने ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तेव्हापासून धोनी केवळ आयपीएलमध्ये खेळत आहे.
धोनीचा यंदाचा हंगाम अखेरचा असल्याचा सूर असल्यामुळे चाहते त्याची झलक पाहण्यासाठी स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात हजेरी लावत आहे. सीएसकेचा सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर असो की मग मुंबईतील वानखेडेवर... सर्वत्र धोनी...धोनीचे नारे पाहायला मिळत आहेत. अनेक क्रिकेट जाणकारांनी धोनीचा हा शेवटचा हंगाम असल्याचे म्हटले आहे.
यंदाच्या हंगामात धोनीला एक खास गोष्ट गिफ्ट मिळाली. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक चाहता कर्णधार एमएस धोनीला खास भेट देताना दिसत आहे. महेंद्रसिंग धोनी याने दोन दिवसांपूर्वी चाहत्यांना स्वत:ची स्वाक्षरी असलेले असंख्य टेनिसबॉल गिफ्ट दिले होते.
आता धोनीला त्याच्या एका चाहत्याने अविस्मरणीय असे गिफ्ट दिले. या चाहत्याने माहीला एम. ए. चिदम्बरम स्टेडियमचे लहान पण हुबेहूब मॉडेल भेट दिले. स्टेडियमची ही प्रतिकृती पाहताच धोनी भारावून गेला. स्पोर्ट्स टायगरच्या वृत्तानुसार भारावलेला धोनी म्हणाला, 'मला आयुष्यात कुणीही असे गिफ्ट दिले नाही. धोनीने अद्याप आयपीएलमधील निवृत्ती जाहीर केलेली नाही. मात्र, सध्याचे सत्र त्याचे अखेरचे सत्र असू शकते, असा तर्क लावला जात आहे.