भारतीय संघातील युवा जलदगती गोलंदाज खलील अहमद याने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसंदर्भात केलेले वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एमएस धोनी हा माझा मित्र किंवा मोठा भाऊ नाही, असे तो म्हणाला आहे. कारण त्याच्या आयुष्यात धोनीचं स्थान यापेक्षा मोठं आणि वेगळं आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमद हा धोनीच्या जबऱ्या चाहत्यांपैकी एक आहे.
खलीलनं शेअर केली धोनीसोबतच्या त्या फोटोमागची स्टोरी
११ वनडे आणि १८ टी-२० सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या डावखुऱ्या गोलंदाजाची माजी क्रिकेटर आणि समोलचक आकाश चोप्रानं मुलाखत घेतली. या मुलाखतीवेळी आकाश चोप्रानं भारतीय गोलंदाजाला एमएस धोनीसोबतचा खास फोटो दाखवला. या फोटोमध्ये धोनी हा खलील अहमदला पुष्पगुच्छ देताना दिसून येते. यामागची नेमकी स्टोरी काय? ते आकाश चोप्रानं जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
धोनी माझा मित्र किंवा मोठा भाऊ नाही, असं का म्हणाला क्रिकेटर
या फोटोमागची स्टोरीसंदर्भात खलील म्हणाला की, हा फोटो न्यूझीलंडमधील आहे. आम्ही सरावासाठी जात असताना माही भाईला त्याच्या मित्रांकडून हा पुष्पगुच्छ दिला होता. त्याने तो मला दिला. माही भाई माझा मित्र किंवा मोठा भाऊ नाही तर तो माझा गुरु आहे, ही मनातली गोष्टही खलीलनं आकाश चोप्राच्या यूट्युब चॅनेलवरील खास मुलाखतीमध्ये बोलून दाखवली.
धोनीमुळं स्वप्न सत्यात उतरलं
या मुलाखतीमध्ये खलील म्हणाला की, झहीर खानला बघत लहानाचा मोठा झालो. त्यामुळे लहानपणापासून भारतीय संघाकडून खेळताना पहिली ओव्हर टाकण्याचे स्वप्न बाळगून होतो. आशिया कप स्पर्धेत माही भाईनं पहिली ओव्हर टाकण्यासाठी बोलवले. त्याचे मन बदलायच्या आत चेंडू हाती घेण्यासाठी मी वेगाने धावलो होतो, असा किस्साही त्याने शेअर केला.
आगामी कसोटी मालिकेसाठी टीम इंडियात वर्णी लागण्याची शक्यता
खलील अहमद याने टीम इंडियात पदार्पण केले त्यावेळी धोनी हा देखील संघाचा भाग होतो. खलीलनं आशिया कप 2018 च्या हंगामात हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यातून वनडे पदार्पण केले होते. आयपीएल २०२४ स्पर्धेतील लक्षवेधी कामगिरी केल्यानंतर टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी राखीव खेळाडूच्या रुपात खलील अहमदच्या नावाचा विचार झाला होता. आता बांगलादेश विरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठीही तो संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत आहे.