आयपीएलमध्ये कॅप्टन कूल धोनीच्या नावावर तसे अनेक विक्रम आहेत. एक उत्तम फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून धोनीनं खूप नाव कमावलं आहे. तसंच तो सर्वोत्तम कर्णधार म्हणूनही ओळखला जातो. पण यावेळी आयपीएल २०२३ च्या पहिल्याच सामन्यात धोनीच्या नावावर एक खास विक्रम नोंदवला गेला आहे.
गुजरात टायटन्स विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात जसं नाणेफेक झाली तसं महेंद्रसिंग धोनी आयपीएलमध्ये नेतृत्व करणारा आजवरचा वयस्कर कर्णधार ठरला आहे. धोनी सध्या ४१ वर्ष आणि २४९ दिवसांचा आहे. धोनी आता लीगमधील सर्वात वयस्कर कर्णधार ठरला आहे.
धोनीनं राजस्थान रॉयल्सकडून खेळलेल्या ऑस्ट्रेलियाचा दिवंगत खेळाडू शेन वॉर्नचा विक्रम मोडला आहे. शेन वॉर्ननं जेव्हा राजस्थानच्या संघाचं नेतृत्व केलं होतं तेव्हा तो ४१ वर्ष आणि २४९ दिवसांचा होता. वॉर्न २०११ सालापर्यंत राजस्थानच्या संघाचा कर्णधार होता. आता हा विक्रम धोनीच्या नावावर जमा झाला आहे.
आयपीएलच्या पहिल्या सीझनपासूनच चेन्नई सुपरकिंग्स संघाचं नेतृत्व धोनी करत आहे. तसंच आयपीएलचे सर्वाधिक जेतेपद जिंकण्याचा विक्रमही चेन्नईच्या नावावर आहे. धोनीनं २०२१ मध्ये चेन्नईला चौथ्यांदा आयपीएलचं जेतेपद मिळवून दिलं होतं.
धोनी जरी सर्वात वयस्कर कर्णधार ठरला असला तरी आपल्या संघाला पाचव्यांदा चॅम्पियन करण्याचं उद्दीष्टानं तो मैदानात उतरला आहे. कारण हे सीजन धोनीचं शेवटचं सीझन ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे.