भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni) याच्या रांची येथील फार्म हाऊसवर मध्य प्रदेशमधून २००० कडकनाथ कोंबड्यांच्या पिल्लांची ऑर्डर पोहोचली आहे. मध्यप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील या काळ्या रंगांच्या कोंबड्यांना प्रचंड मागणी आहे. मध्य प्रदेशने २०१८ मध्ये छत्तीसगड सोबत या कडकनाथ कोंबड्यांच्या हक्कावरून असलेला वाद जिंकला. या कोंबड्यांना बाजारात खूप मागणी असल्याने त्यांची किंमतही अधिक आहे. झाबुआचे जिल्हाधिकारी सोमेश मिश्रा यांनी २००० कडकनाथ ‘Kadaknath’ कोंबड्यांच्या पिल्लांची ऑर्डर धोनीने दिल्याचे PTI ला सांगितले. शुक्रवारी ही पिल्लं धोनीच्या फार्म हाऊसवर पोहोचली.
''धोनीसारख्या प्रतिष्ठीत व्यक्तीने कडकनाथ कोंबड्यांच्या व्यावसायात रस दाखवणे हे स्वागतार्ह पाऊल आहे. ऑनलाईन माध्यमातून कोणीही या कोंबड्यांसाठी ऑर्डर देऊ शकतो. याने येथील आदिवासी लोकांचा आर्थिक फायदा होतोय, ''असे जिल्हाधिकारी मिश्रा म्हणाले. धोनीने बऱ्याच दिवसांपूर्वी ही ऑर्डर दिली होती, परंतु बर्ड फ्लूमुळे ती आम्ही वेळेत पूर्ण करू शकलो नव्हतो, असे झाबुआ कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. आय एस तोमर यांनी सांगितले. एक दिवसाच्या कडकनाथ कोंबडीच्या पिल्लाची किंमत ही ७५ रुपये आहे, तर १५ व २८ दिवसांनी त्याची किंमत अनुक्रमे ९० व १२० इतकी जाते.
भारतीय संघाचा माजी कर्णधार धोनी रांची येथी फार्म हाऊसवर सेंद्रीय शेती करतो. शिवाय विविध फळभाज्यांचेही उत्पादन घेतले जाते. धोनीने मध्य प्रदेशातील आदिवासी बांधवांना आर्थिक मदत मिळावी म्हणून २००० कडकनाथ कोंबड्यांच्या पिल्लांची ऑर्डर दिल्याची चर्चा सुरू आहे.