नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसाठी सप्टेंबर महिना अतिशय चांगला राहिला आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी धोनीची टीम इंडियाच्या मेंटरपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आता धोनीला आणखी एक जबाबदारी मिळाली आहे. नॅशनल कॅडेट कोरला (एनसीसी) नवं रुप देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीत धोनीला स्थान देण्यात आलं आहे.
एनसीसीच्या व्यापक समीक्षेसाठी संरक्षण मंत्रालयानं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. या समितीत धोनीचा समावेश आहे. समितीचं अध्यक्षपद माजी खासदार बैजयंत पांडा यांच्याकडे देण्यात आलं आहे. धोनी भारतीय लष्कराशी याआधीच जोडला गेला आहे. त्याच्याकडे मानद लेफ्टनंट कर्नलपद आहे. संरक्षण मंत्रालयानं नेमलेल्या समितीत १५ जणांचा समावेश आहे. महिंद्रा समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा यांचाही समितीमध्ये समावेश आहे.
वर्ल्ड कपनंतर ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार, विराट कोहलीनं केलं जाहीर
याआधी ८ सप्टेंबरला बीसीसीआयनं टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. एम. एस. धोनीची संघाचा मेंटर म्हणून निवड करण्यात आली. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याबद्दलची घोषणा केली. संयुक्त अरब अमिरात आणि ओमानमध्ये १७ ऑक्टोबरपासून टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. धोनीनं गेल्याच वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. २०१९ च्या विश्वचषकातला उपांत्य फेरीचा सामना धोनीचा शेवटचा सामना ठरला.
Web Title: MS Dhoni part of Defence Ministry committee to give a facelift to NCC
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.