MS Dhoni Opening Batting, CSK vs RCB: IPL 2022 मध्ये मंगळवारी दोन मोठ्या संघांचा सामना होत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर सामना रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज अजूनही या हंगामातील पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (एमएस धोनी) याच्या फलंदाजीच्या क्रमांकाची चर्चा सुरू आहे. महेंद्रसिंग धोनीने पहिल्या सामन्यात अर्धशतक ठोकले, पण त्यानंतर तो सातत्याने फलंजाजीत अपयशी ठरताना दिसत आहे. अशा परिस्थितीत, आजच्या सामन्यात धोनी सलामीवीर म्हणून खेळताना दिसणार का, अशी चर्चा होत आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेल याने एमएस धोनीच्या बॅटिंग पोझिशनबाबत एक ट्विट केले आहे. पार्थिव पटेलच्या मते, एमएस धोनीचे तंत्र जरी सलामीवीर फलंदाजाला साजेसे नसले, तरी कठीण परिस्थितीत स्वतःचे संरक्षण करण्याचा मार्ग कसा काढावा याची त्याला माहिती आहे. धोनी सुरूवात संथ करून नंतर आपल्या खेळीचा वेग वाढवण्यात पटाईत आहे. अशा स्थितीत चेन्नई सुपर किंग्जने एमएस धोनीला सलामीवीर म्हणून संधी देण्यात काही हरकत नाही. तुम्हाला काय वाटते?, असे ट्वीट पार्थिव पटेलने केले.
आयपीएलच्या इतिहासात धोनीने आतापर्यंत कधीच ओपनिंग फलंदाजी केलेली नाही. पण आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत धोनी मोजक्या वेळी सलामीला आला आहे. वन डे सामन्यांमध्ये धोनीने एकूण दोन सामन्यांमध्ये ओपनिंग केली आहे. त्यापैकी एका डावात तो २ धावांवर बाद झाला होता, तर दुसऱ्या डावात त्याने ९६ धावांची दमदार खेळी केली होती.