मुंबई : सध्याच्या घडीला भारताचा माजी कर्णधार महेद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या बऱ्याच बातम्या येत आहे. काल भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीच्या निवृत्तीबाबत भाष्य केले होते. हे सर्व सुरु असतानाच धोनीने आयपीएलमधीलचेन्नई सुपर किंग्स संघाला खास वचन दिले आहे. यामध्ये आपले कर्णधारपदाचे वजन कधीपर्यंत वापरणार, याबाबत धोनीने खुलासा केला आहे.
आगामी आयपीएलनंतर धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे शास्त्री यांनी काल म्हटले होते. त्यामुळे यंदाचे आयपीएल धोनीसाठी फार महत्वाचे असणार आहे. पण यंदाच्या आयपीएलमध्ये तो खेळणार की नाही, याबद्दलही अजून काही जणांच्या मनात संभ्रम आहे.
धोनी यंदाची आयपीएल खेळणार का? धोनी आणि चेन्नईचा संघ यांच्यामध्ये याबाबत काय चर्चा झाली आहे, याबाबत टाईम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्राने एक वृत्त दिले आहे. या वृत्तामध्ये धोनी आणि चेन्नईचे संघ व्यवस्थापन यांच्यामध्ये आयपीएलबद्दल चर्चा झाल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर मी २०२१ पर्यंत तरी चेन्नईच्या संघाबरोबर कायम राहीन, असे धोनीने चेन्नईच्या संघाला सांगितल्याचेही या वृत्तामध्ये म्हटले आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागल्या आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. त्यानं दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, बांगलादेश या मालिकेतून विश्रांती घेतली आणि मायदेशात होणाऱ्या विंडीजविरुद्धच्या मालिकेतही त्याचा संघात समावेश नाही. त्यामुळे धोनीच्या मनात नेमकं काय चाललंय, याचा अंदाज कुणालाही बांधता येत नाही. पण, धोनीच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवृत्तीचं टायमिंग ठरलेलं आहे आणि माही स्वतः त्याची घोषणा करेल, असे समजते.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या मालिकेतून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल, असे वाटत होते. मात्र, निवड समितीनं जाहीर केलेल्या ट्वेंटी-20 आणि वन डे अशा दोन्ही संघांत धोनीचं नाव नसल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. विंडीजविरुद्ध धोनी पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रीय होऊ शकतो, अशा चर्चा होत्या. पण, आता धोनी नक्की कधी मैदानावर दिसेल, याची पुन्हा एकदा उत्सुकता लागली आहे.
महेंद्रसिंग धोनी मार्च 2020मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार, पण टीम इंडियाकडून नाही खेळणार?
विंडीज मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया, श्रीलंका हे संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. या तीनही मालिकेत धोनीचा संघात समावेश नसेल. इंडियन प्रीमिअर लीगच्या हंगामापूर्वी धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार आहे. बांगलादेश येथे होणाऱ्या आशियाई एकादश आणि जागतिक संघ यांच्यात दोन ट्वेंटी-20 सामने होणार आहेत. या दोन्ही सामन्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा आहे आणि यात धोनी आशियाई संघाचे प्रतिनिधित्व करण्याची शक्यता आहे. 18 आणि 21 मार्च या तारखेला हे सामने होणार आहेत.
इंडियन प्रीमिअर लीगनंतर धोनी निवृत्तीबाबत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ''आयपीएलनंतर धोनी त्याच्या भविष्याबाबतचा निर्णय घेईल. तो एक मोठा खेळाडू आहे आणि त्याच्या निवृत्तीबाबतच्या चर्चा होतच राहणार. मागील एका महिन्यापासून तो कसून मेहनत घेत आहे आणि तो तंदुरुस्त आहे. आयपीएलपूर्वी धोनी किती स्पर्धात्मक सामने खेळतो, यावरही सर्व अवलंबून आहे,''असे सूत्रांनी सांगितलं.
Web Title: MS Dhoni promises Chennai Super Kings regarding IPL captaincy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.