भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवत रहावं, ही तमाम चाहत्यांची इच्छा आहे. नुकताच त्यानं 39वा वाढदिवस साजरा केला. तसं पाहिलं तर खेळाडूला वयाचं बंधन नसतं.. क्रिकेटच्या इतिहासात पस्तिशीनंतर क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या आणि वयाच्या साठीपर्यंत खेळणाऱ्या क्रिकेटपटूंची उदाहरणं आहेत. मग धोनी तर आता चाळीशीत प्रवेश करत आहे. त्याचं निवृत्तीचं वय झालेलं नाही. त्यामुळे त्यानं ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, 2023चा वर्ल्ड कप आणि अजून पुढे खेळत राहावं, अशी इच्छा असण्यात काहीच वावगं नाही. पण, ते संघाच्या हिताचं नसल्यानं धोनीनं निवृत्ती घेतली.
जुलै 2019पासून धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही आणि त्यापूर्वीच्या त्याची मैदानावरील खेळी ही विशेष बोलकी नव्हती. ग्रेट फिनीशर अशी ओळख असलेला धोनी हरवल्यासारखा वाटत होता. दरम्यान लॉकडाऊनच्या काळातही त्याचा फोटो चर्चेचा विषय बनला होता. पांढरी दाढी, सुटलेलं शरीर पाहून धोनी थकलाय, अशी चर्चा सुरू झाली. पण, सर्वांचे अंदाज चुकवून आश्चर्याचा धक्का देण्याचे कसब धोनी जाणतो. त्यामुळेच क्रिकेटला सुरुवात होईल, तेव्हा धोनी त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये दिसेलही. इंडियन प्रीमिअर लीगमधील चेन्नई सुपर किंग्स संघानं धोनी 2021नंतरही संघासोबत कायम राहिल अशी घोषणा केली. पण, आयपीएल ही व्यायसायिक लीग आहे आणि त्यामुळे कोणत्या खेळाडूनं किती काळ खेळावं हा संघाचा निर्णय असतो.
टीम इंडियाच्या बाबतीत बोलायचं तर धोनीनं आता निवृत्ती घेतली नसती, तर देशाच्या क्रिकेटला त्याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नव्हती... 2011पूर्वीचा एक किस्सा सहज आठवला... संघाचं हित लक्षात घेऊन काही टफ कॉल घेण्याची गरज असल्याचे धोनी म्हणाला होता. धोनीच्या मुखातून निघालेले हे वाक्य आज त्यालाच लागू पडेल असा विचार कुणी केला नव्हता. वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी धोनीनं संघातील वरिष्ठ खेळाडूंबाबत कठोर निर्णय घेण्याची मागणी निवड समितीसमोर ठेवली होती. त्याचं हे म्हणणं मान्य झालं अन् अनेक वरिष्ठ खेळाडूंना संघाबाहेर केले गेले. पण, त्याच्या या निर्णयाचा रिझल्ट आपल्याला मिळाला आणि 2011मध्ये आपण वन डे वर्ल्ड कप जिंकला. 28 वर्षांची प्रतीक्षा संपली.
आता धोनीच्या बाबतीतही तसाच टफ कॉल घेण्याची वेळ आली होती.. 2019च्या वर्ल्ड कपनंतर धोनी क्रिकेटपासून दूर आहे आणि त्या दरम्यान रिषभ पंतला संधी दिली गेली. त्यावर तो किती खरा उतरला, हे सर्वांना माहित आहेच. पण, धोनी दूर राहिल्यानं रिषभ, सजू सॅमसन आदी पर्यायांचा विचार सुरू झाला. अन्यथा हे युवा खेळाडू आयपीएल आणि स्थानिक क्रिकेटपूरतेच मर्यादित राहिले असते. पण, म्हणून धोनीनं तातडीनं निवृत्ती घ्यावी आणि कुटुंबीयांसोबत रांचीत सेटल व्हावे असे नाही. त्यानं त्याच्या अनुभव युवकांसोबत शेअर करून त्यांना मार्गदर्शन करावं. युवा खेळाडूंना धोनीनं नेहमीच मार्गदर्शन केलं आहे, यापुढेही त्याच्याकडून हीच अपेक्षा असेल. पण, मैदानावरून नव्हे तर बाहेरून युवकांना मार्गदर्शन करण्याची वेळ आली आहे. संघ हिताचं स्वतःचं वाक्य धोनीनं लक्षात ठेवून योग्य पाऊल उचलले.
महेंद्र सिंह धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
MS Dhoni Retirement: मै पल दो पल का शायर हूँ...! निवृत्ती जाहीर करताना MS Dhoniनं दिला 'खास' संदेश!