मुंबई - आज देशात ७४ वा स्वातंत्र्य दिन कोरोनाच्या सावटाखालीही मर्यादेत आणि उत्साहात संपन्न झाला. देशवासीय स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहातून बाहेर येत असतानाच भारताच्या आतापर्यंतच्या सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीचे वृत्त येऊन धडकले. कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या अचानक आलेल्या वृत्तामुळे देशातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे. निवृत्तीचा मोठा निर्णय जाहीर करण्यासाठी धोनीने १५ ऑगस्टचाच दिवस का निवडला याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, याबाबतचं मोठं कारण आता समोर आलं आहे.
१५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी निवृत्ती जाहीर करून धोनीने आपल्या देशप्रेमाची प्रचिती दिली आहे. निवृत्ती स्वीकारण्यासाठी आजच्या दिवसासारखा चांगला दिवस कुठला असू शकत नाही, हे धोनीने दाखवून दिले आहे. तसेच १५ ऑगस्टसारख्या ऐतिहासिक दिनी निवृत्ती स्वीकारल्याने धोनीच्या निवृत्तीचा दिवस कायम स्मरणार राहणार आहे. जेव्हा जेव्हा धोनीच्या निवृत्तीची तारीख विचारली जाईल. तेव्हा सहजपणे आजचा दिवस डोळ्यांसमोर येईल.
तसेच १५ ऑगस्टला निवृत्ती स्वीकारण्याच्या कारणांमागील अजून एक कारण म्हणजे आजच धोनीने आपल्या वयाची ३९ वर्षे आणि ३९ दिवस पूर्ण केली आहेत. तसेच धोनीच्या जीवनात ७ या आकड्याला सुद्धा विशोष महत्त्व आहे. ७ जुलै रोजी जन्मलेल्या धोनीच्या जर्सीचा नंबरसुद्धा ७ होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असली तरी धोनीने क्रिकेट सोडलेले नाही. धोनी आता आयपीएल खेळणे चालू ठेवणार आहे. दरम्यान, धोनीने आपल्या निवृत्तीच्या निर्णयाची कल्पना आजच बीबीसआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना दिली होती.
भारतीय संघाला पहिल्यांदाच कसोटी आणि एकदिवसीय क्रमवारीत अव्वलस्थानावर पोहोचवणारा कर्णधार म्हणून मान मिळवणाऱ्या धोनीने कसोटी क्रिकेटमधून आधीच निवृत्ती स्वीकारली होती. मात्र टी-२० आणि एकदिवसीय या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो मैदान गाजवत होता. पण गतवर्षी झालेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकानंतर धोनीला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नव्हती. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू होत्या.
धोनीने ९० कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करताना ३८.०९ च्या सरासरीने ६ शतके व ३३ अर्धशतकांसह ४८७६ धावा केल्या आहेत. तर ३५० एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ५०.५७ च्या धडाकेबाज सरासरीने १० हजार ७७३ धावा फटकावल्या. त्यामध्ये १० शतकं व ७३ अर्धशतकांचा समावेश आहे. तर ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये माहीने ९८ सामन्यांत १६१७ धावा केल्या.फलंदाजीसोबतच धोनीने यष्टीमागूनही त्याने भारतीय संघाला भरभरून योगदान दिले. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर २५६ झेल व ३८ स्टम्पिंग, तर वन डेत ३२१ झेल व १२३ स्टम्पिंग आणि ट्वेंटी-२०त ५७ झेल व ३४ स्टम्पिंग आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
MS Dhoni Retirement: माहीच्या कारकीर्दीतील अविस्मरणीय क्षण, ज्यांनी धोनीला बनवले चॅम्पियन कॅप्टन
MS Dhoni Retirement: अशी कामगिरी करणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार
महेंद्र सिंह धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
Web Title: MS Dhoni Retirement: ... so Dhoni chose August 15 for retirement, this is a special reason
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.