नवी दिल्ली : कोणत्याच भारतीय खेळाडूला विदेशातील लीगमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) परवानगी दिली नाही. दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि यूएईमध्ये (UAE) होणाऱ्या टी-२० लीगने क्रिकेट वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. मात्र भारतीय खेळाडू या लीगमध्ये खेळू शकणार नाहीत. लक्षणीय बाब म्हणजे एखाद्या भारतीय खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरीदेखील त्याला विदेशातील लीगमध्ये खेळता येणार नाही. आयपीएलमध्ये (IPL) खेळलेला कोणताच भारतीय खेळाडू या लीगमध्ये प्रशिक्षकाच्या भूमिकेतही असू शकत नाही असे बीसीसीआयने स्पष्ट केले.
...तरच भारतीय खेळाडू विदेशी लीगमध्ये खेळू शकतात
जर एखाद्या भारतीय खेळाडूला विदेशातील लीगमध्ये खेळायचे असेल तर त्याला बीसीसीआयशी असलेले सर्व संबंध तोडावे लागतील. महेंद्रसिंग धोनी अन्य लीगमध्ये प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसू शकतो का अशी विचारणा केली असता बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले, "त्याला विदेशातील लीगमध्ये सहभागी व्हायचे असेल तर तो आयपीएलमध्ये खेळू शकत नाही. त्याला सर्वप्रथम भारताच्या लीगमधून निवृत्त व्हावे लागेल." एकूणच आयपीएलमधून वेगळे झाल्यानंतरच कोणत्याही भारतीय खेळाडूला विदेशातील लीगमध्ये सहभागी होता येणार आहे.
दरम्यान, २०१९ मध्ये भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक ट्रिनबागो नाइट रायडर्सच्या ड्रेसिंग रूममधून कॅरिबियन प्रीमियर लीग सामना पाहत होता. त्याने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी माफी देखील मागितली होती. केंद्रीय करारानुसार कार्तिकने सामन्यात सहभागी होण्यापूर्वी बीसीसीआयची परवानगी घेणे आवश्यक होते. कार्तिकने आपली चूक कबुल करताना म्हटले होते की, तो केकेआरचे तत्कालीन नवनिर्वाचित प्रशिक्षक ब्रॅंडन मॅक्युलम यांच्या सांगण्यावरून ड्रेसिंग रूममध्ये गेला आणि त्यांच्याच सांगण्यावरून टीकेआरची जर्सी घालून सामना पाहिला.
विदेशातील लीगमध्ये IPL चा दबदबा
इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL) सहा संघाच्या मालकांनी दक्षिण आफ्रिकेतील टी-२० लीगमध्ये संघ खरेदी केले आहेत. आयपीएलमधील मुंबई, लखनौ, हैदराबाद, चेन्नई, राजस्थान आणि दिल्ली या फ्रँचायझीचे मालक आता केपटाउन, डरबन, पोर्ट एलिझाबेथ, जोहान्सबर्ग, पार्ल आणि प्रिटोरिया या संघाचे देखील मालक आहेत. तर यूएई टी-२० लीगमधील ६ पैकी ५ फ्रँचायझींचा भारतीय मालकांनी खरेदी केले आहे.
Web Title: MS Dhoni retires from IPL then he can participate in overseas T20 leagues
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.