मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या बातम्या काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. पण त्या अफवा ठरल्या होत्या. पण आता भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या ट्विटरवर धोनीबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमधून कोहलीने धोनीच्या निवृत्तीबाबतचे सूचक विधान केले आहे, असे म्हटले जात आहे.
कोहलीने जो फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यामध्ये कोहली हा गुडघ्यावर बसला आहे. आपली बॅट त्याने डोक्यावर घेतली आहे. कोहलीच्या समोर यावेळी धोनी उभा आहे. पण या फोटोमधून कोहली धोनीला कुर्निसात करतोय का, असे चाहत्यांना वाटत आहे. धोनीसारख्या महान कर्णधाराला निरोप देतना असा सलाम करावा लागेल, त्यामुळे कोहलीने आपल्या ट्विटरवर हा फोटो पोस्ट केल्याचे म्हटले जात आहे. धोनी तु ग्रेट होतास, असे या फोटोमधून कोहलीला दाखवून द्यायचे आहे, असेही चाहते म्हणत आहेत. पण एकंदरीत यामधून धोनी निवृत्त होत असल्याचा सूर निघत असल्याचे संकेत मिळत असल्याचे चाहत्यांना वाटत आहे.
हा फोटो 2016 साली झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमधील आहे. या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पराभूत केले होते. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांमध्ये 6 बाद 160 अशी धावसंख्या रचली होती. भारताने हा सामना 19.1 षटकांमध्ये जिंकला होता.
कोहलीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, " हा सामना माझ्यासाठी खास होता. कारण धोनीने मला या सामन्यात असे काही धावांसाठी पळवले होते की, जशी माझी फिटनेस टेस्ट सुरु आहे."