सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : कसोटी मालिकेतील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघ वन डे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. कसोटी मालिकेतील संघाचे सदस्य नसलेले, परंतु वन डे मालिकेत खेळणार असलेले सदस्य सिडनीत दाखल झाले आहेत. तीन सामन्यांची ही मालिका शनिवारपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, युझवेंद्र चहल, केदार जाधव, खलील अहमद आणि रोहित शर्मा सिडनीत दाखल झाले आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत धोनीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला नव्हता. त्याची निराशाजनक कामगिरी ही चर्चेचा विषय ठरत असली तरी वन डे वर्ल्ड कपसाठी तो संघाचा प्रमुख खेळाडू आहे. त्यामुळे वर्ल्ड कपपूर्वी पुन्हा फॉर्म मिळवण्यासाठी त्याला ही योग्य संधी आहे. जसप्रीत बुमरा याला विश्रांती देण्यात आल्यामुळे मोहम्मद सिराजचा वन डे आणि सिद्धार्थ कौलचा ट्वेंटी-20 संघात समावेश करण्यात आला आहे. खलील अहमदनेही आपल्या कामगिरीने बीसीसीआयला प्रभावित केले आहे.